पुण्याच्या बाजारपेठेमध्ये अनधिकृत पध्दतीने पिकविलेला आंबा नाही : एफडीए
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 06:00 IST2019-05-19T06:00:00+5:302019-05-19T06:00:07+5:30
आंब्याची मोठी बाजारपेठ म्हणून पुण्याच्या बाजार पेठेकडे पाहिले जाते.

पुण्याच्या बाजारपेठेमध्ये अनधिकृत पध्दतीने पिकविलेला आंबा नाही : एफडीए
पुणे: आंब्याची मोठी बाजारपेठ म्हणून पुण्याच्या बाजार पेठेकडे पाहिले जाते.परंतु,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होणारा आंबा पिकविण्यासाठी सध्या इथेलिन चेंबरची व्यवस्था उपलब्ध नाही. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या मार्गदर्शनामुळे मानवी शरीरास घातक असलेल्या रासायनिक द्रव्यांचा वापर आंबा पिकविण्यासाठी व्यापा-यांकडून केला जात नाही.त्यातच वाढत्या तापमानामुळे आंबा नैसर्गिक रित्याच पिकविला जात आहे,असा दावा आंब्याचे विक्रेते रोहन उरसळ यांनी केला.तसेच सध्या पुण्यातील मार्केटमध्ये कुठेही अनधिकृत पध्दतीने आंबा पिकविला जात नाही,असे एफडीएच्या अधिका-यांनी सांगितले.
आंब्यासह फळे पिकवण्यासाठी कॅल्शिआम कार्बाईड व अॅसिटीलीन गॅस यांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. मात्र, कॅल्शिअम कार्बाईडमध्ये असलेल्या आर्सेनिक व फॉस्फरस या घातक द्रव्यामुळे उलट्या,जुलाब, छातीत व पोटात जळजळ होणे,अशक्तपणा या सारखे त्रास होत असल्याचे समोर आले. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2011 च्या अधिनियम 2.3.5 नुसार कॅल्शिअम कार्बाईडने फळे पिकविण्यास बंदी घालण्यात आली.भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय ) फळे पिकविण्यासाठी इथेपॉनचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. प्रत्यक्ष संपर्कात न आणता सॅचेसमध्ये आवेष्टन (पॅक)करण्यात आलेल्या इथोपॉन पावडरचा वापर आंबा पिकविण्यासाठी करण्यास कायदेशीर परवानगी आहे.त्यामुळे नैसर्गिक रितीने आंबा पिकविण्याबरोबच आंबा पिकविण्यासाठी इथेपॉन पावडर वापरली जात आहे,असे एफडीएचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.आंब्याचे विक्रेता रोहन उरसळ म्हणाले, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्यासह दक्षिणेकडील राज्यातूनही आंब्याची आवक होते. प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ राज्यातून आत्तापर्यंत सुमारे 18 ते 20 हजार पेटी आंब्याची आवक झाली. मागील वर्षी सुमारे 40 ते 50 हजार पेटी आवक झाली होती.त्यात हापुस आंब्यासह,लालबाग, बदाम, मलगोबा, तोतापूरी, निलम आदी जातीच्या आंब्याची आवक होते.
आंबा कसा पिकतो ?
इथेलिन चेंबरच्या माध्यमातून आंबा पिकवला जातो.आंबा पिकविण्यासाठी इथेपॉनचा चा गॅस स्वरुपात वापर करता येतो. मात्र,कॅल्शिअम कार्बाईटच्या वापराला पारवानगी नाही.चार वर्षांपूर्वी पुणे मार्केट यार्डात अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईनंतर एकही विक्रेता कॅल्शिअम कार्बाईटचा वापर करत नाही. या उलट आंब्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी एफडीएच्या अधिका-यांंना बोलावून आंबा विक्रेत्यांनी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, याबाबत कार्यशाळा आयोजित करून माहिती घेतली जाते,असेही उरसळ म्हणाले.