प्यायला पाणी नाही! तर दुसरीकडे ओला दुष्काळ!!
By Admin | Published: March 28, 2016 03:17 AM2016-03-28T03:17:00+5:302016-03-28T03:17:00+5:30
नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीस पाणी देण्याची पद्धत ही ओला दुष्काळ पडण्यासारखी आहे, तर न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांना कोरड्या (पाण्याविना) दुष्काळात कसे
रांजणगाव सांडस : नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीस पाणी देण्याची पद्धत ही ओला दुष्काळ पडण्यासारखी आहे, तर न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांना कोरड्या (पाण्याविना) दुष्काळात कसे जगावे याचा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे हे चित्र एकाच मंडल अधिकार क्षेत्रातील आहे.
पाणीवाटपाचे नियम हे पूर्वी कडक होते. पाटबंधारे विभागाकडून पाणी वाया गेल्यास पाण्याच्या प्रमाणात दंड आकारला जात असे; परंतु अलीकडील काळात शेतास भरपूर पाणी देत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिरिक्त पाण्याचा ओला दुष्काळ जाणवू लागला आहे. कारण, या भागात सतत पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनी नापीक झालेल्या आहेत.
वाळकी -रांजणगाव सांडस या बेट भागात मुळा-मुठा-भीमा या नद्यांचा संगम झालेला आहे; तसेच पारगाव (ता. दौंड) येथे पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधलेला असून, या बंधाऱ्याला प्लेटा टाकल्यावर, या पाण्याचा फुगारा हा राहू भागातील बंधाऱ्यापर्यंत पोहोचतो, त्यामुळे या भागात बारमाही पाणी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
शेतीस पाणीपुरवठा करण्यासाठी वैयक्तिक तसेच सहकारी पाणीपुरवठा योजना राबवून शेतीस पाणीपुरवठा या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. परंतु, विजेचे भारनियमन हे रात्री व दिवसा असल्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी उसाच्या शेतात मोकळे पाणी सोडून वीज जात नाही, तोपर्यंत पाणी पाहण्यास जात नसल्यामुळे पाणी हे दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेत भिजवून पाणी ओढ्यास वाहून जात आहे.
पानगवताने ओढे ( कंजाळ) भरल्यामुळे पाणी हे पुढे सरकत नाही, परिणामी शेतात क्षारांचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच, या भागातील रस्त्यांना गटारांचे स्वरूप आलेले आहे. पावसाळ्यातही रस्त्याची दयनीय अवस्था होत नाही, एवढी या भागातील पाईपलाईन लिकेजमुळे झालेली आहे.
लिकेज माझे नाही तुझे आहे, तू काढ, अशी भावना असल्यामुळे पाणी वाया जात आहे. सार्वजनिक रस्त्याचे गटार होत आहे, पण लिकेज काढण्यास शेतकरी हा पुढे येत नाही. त्यामध्ये पाटबंधारे विभागाने कडक कारवाई करण्यास सुरुवात करावी. दुष्काळी भागातील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागणार नाही, या नदीकाठच्या नागरिकांना पाणी असूनही दुष्काळ हा वीज गेल्यावर जाणवतो. कारण वीज नसेल तर पाणी मिळत नाही, त्या दिवशी पाणी हे जपून वापरले जाते. (वार्ताहर)
शिरूर पाणीपुरवठा योजना राबवा
पुरंदर तालुक्याला जशी पुरंदर उपसा सिंचन योजना राबवून पाणीपुरवठा केलेला आहे, तसाच भीमा नदीवरून शिरूर पाणीपुरवठा योजना राबविली तर न्हावरे,करडे, निरवी,आंबळे, उरळगांव, कोळपेवस्ती, दहीवडी, रांजणगाव गणपती, कळवंत वाडी, शिरसगाव काटा, आंधळगाव, कुरुळी, सरहद वाडी या भागातील लहान वाड्यावस्त्या यांना वर्षभर पाणी हे पिण्यास व शेतीस उपलब्ध होऊ शकते.
चासकमानच्या कॅनॉलमधून या पाण्याचा विसर्ग केल्यास नगर जिल्ह्यातील काही गावांना पाणी मिळू शकते, हे काम लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले तर होऊ शकते.