दहा दिवस पाणी नाही

By admin | Published: December 12, 2015 12:46 AM2015-12-12T00:46:18+5:302015-12-12T00:46:18+5:30

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील १६ गावच्या हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे जलाशयातून पारगाव

There is no water for ten days | दहा दिवस पाणी नाही

दहा दिवस पाणी नाही

Next

सासवड : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील १६ गावच्या हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे जलाशयातून पारगाव - माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना केली असून गेल्या १० ते ११ दिवसांपासून ही योजना बंद आहे. यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.
सध्या या भागात टंचाईची परिस्थिती असून मध्यंतरी झालेल्या पावसामुळे नाझरे जलाशयात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र पाणी उपसा करणारे पंप जळाले आहेत. जलवाहिनीला गळती असल्याची कारणे दाखवून योजना आणखी काही दिवस बंद ठेवणार असल्याचे पत्र योजना समितीने शासनाला दिले आहे. मात्र पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हैराण झाले आहेत. पाण्याच्या टँकरची मागणी करूनही मिळत नसल्याने आता या १६ गावांतील लोक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे नायगाव ग्रामपंचायत सदस्य किशोर खळदकर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. सध्या योजनेचे १५० एचपीचा १, ५० एचपीचे २ आणि १५ एचपीचा १ पंप असून जलाशयाखालील जलवाहिनीला गळती लागली असल्याने समितीने जलसंपदा राज्यमंत्री, जि. प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार पुरंदर, गटविकास अधिकारी यांना पत्र दिले असून वरील कारणांमुळे योजना १० दिवसांपासून बंद आहे. समिती योजना चालविण्यास सक्षम नाही. त्यामुळे शासनाने जबाबदारी घेऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे पत्रात नमूद केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (वार्ताहर)
> सध्या या योजनेला जिल्हा परिषदेकडून सुमारे २५ लाखांचा निधी नवीन पंप घेण्यासाठी मिळाला आहे. मात्र योजना सुरळीत चालविण्यासाठी हा निधी पुरेसा नाही. योजना चालविणाऱ्या समितीने शासनाला पत्र देऊन जबाबदारी झटकून दिली. याच जलाशयातून बारामती तालुक्यातील मोरगाव प्रादेशिक योजना आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या योजनेचे पंप, जलवाहिन्यांसाठी २० कोटींचा निधी मिळाला होता, परंतु पुरंदर तालुक्याच्या पारगाव - माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस असा भरीव निधी कधीच मिळाला नाही.

Web Title: There is no water for ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.