पुण्यामध्ये तूर्तास पाणीकपात नाही
By admin | Published: April 11, 2017 04:00 AM2017-04-11T04:00:50+5:302017-04-11T04:00:50+5:30
पुणे शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा कायम राहणार असून तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पुणे : पुणे शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा कायम राहणार असून तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून, हा उन्हाळा काहीअंशी सुसह्य होईल.
विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त दिनेश वाघमारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, बाबूराव पाचर्णे, जयदेव गायकवाड, दत्तात्रय भरणे, शरद रणपिसे, बाळा भेगडे आदी उपस्थित होते. पुणे शहराचे पाणी शहराला मिळणार आहे. पालिकेला मंजूर साठ्याप्रमाणे पाणी देण्यात येणार असून, १६ जुलैपर्यंत पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. जर दुरुस्तीची कामे निघालीच, तर महिन्यातून आवश्यकता भासल्यास दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, असे बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगताच आमदार शरद रणपिसे यांनी ही एक प्रकारची कपातच, असे म्हणत त्याला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांनी त्यांची दुरुस्ती आवश्यक असते, असे सांगून समजूत घातली.
पाणीसाठा आणि पाणीवाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक करण्यात आलेला नाही. खराडी बेबी कॅनॉलसह मुळा-मुठा कालव्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. पुणेकरांनी जपून पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी मिळून पुनर्वसनासाठी १३१ कोटी रुपये आणि पाण्याचे १७२ कोटी धरणाच्या कामासाठी देणे आहे. १७२ कोटींबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. मात्र, तूर्तास १३१ कोटी रुपये देण्यासाठी दोन्ही महापालिका आगामी काळात सर्वसाधारण सभेच्या वेळी ठराव मंजूर करून पैसे देण्याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर काम सुरू केले जाणार आहे. याबाबत दोन बैठका घेण्यात येणार असून, महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
भामा-आसखेड धरणाचे २.६ टीएमसी पाणी पुण्याला मिळणार आहे. येरवड्यापासून आळंदीपर्यंत नागरीकरण झालेले आहे. या पाण्यामुळे खडकवासलाच्या पाण्यावर येणारा ताण कमी होईल. पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे.
-गिरीश बापट, पालकमंत्री