शेतीला अावश्यक तेवढा पाऊस नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 05:22 PM2018-09-13T17:22:25+5:302018-09-13T17:23:14+5:30
मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही़.
पुणे : मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही़. १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १८ सप्टेंबरपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही़. त्याचदरम्यान मॉन्सूनच्या परतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आता परतीच्या पावसावरच प्रामुख्याने आशा केंद्रीत झाल्या आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या तीनही विभागात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. याशिवाय अहमदनगर (-१३), धुळे व जळगाव (-१७), परभणी (-१५), यवतमाळ (-१३) टक्के पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ टक्के जादा पाऊस झाला असून ठाणे ११ टक्के, नांदेड ९ टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे. ईशान्य भारतातील काही राज्यांचा अपवाद वगळता सध्या संपूर्ण भारतात मॉन्सून थबकलेला आहे. अरबी समुद्र तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार न झाल्याने देशभरात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. महाराष्ट्रासारखीच अनेक राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. रायलसीमा भागात सरासरापेक्षा तब्बल ४६ टक्के पाऊस कमी झाला आहे.
पुढील चार दिवस मॉन्सूनची स्थिती अशीच राहण्याची शक्यता असून १८ सप्टेंबर दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे मध्य भारतात काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असून त्याचा फायदा राज्यातील काही जिल्ह्यांना होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्के) सोलापूर (- ३१), सांगली (-३०), नंदूरबार (- २९), औरंगाबाद (-२५), बुलढाणा व वर्धा (- २४), लातूर (-२३), अमरावती व बीड (- २२), जालना (-२१)
१ जून ते १२ सप्टेंबर पर्यंत पडलेला पाऊस( मिमी)
विभाग प्रत्यक्ष सरासरी फरक
कोकण २८२५़१ २७४२ ३
मध्य महाराष्ट्र ६२७़८ ६३४ -१
मराठवाडा ५१०़२ ५८९ -१३
विदर्भ ८२०़३ ८७५ -६