जिल्ह्यातील साडेचारशे गावांत एकही कोरोना रुग्ण नाही; शाळा सुरू करण्यासाठी मागविले प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:00+5:302021-07-11T04:09:00+5:30
डमी स्टार ९०१ - शासनाच्या आदेशानुसार गावांमध्ये समिती स्थापन करण्याचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये ...
डमी स्टार ९०१
- शासनाच्या आदेशानुसार गावांमध्ये समिती स्थापन करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करून समितीने ना हरकत दिल्यानंतरच, शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यात देखील मागील एक महिन्यात संबंधित गावात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही.
जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळुहळू ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने टप्प्या- टप्प्याने शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात गेल्या एक महिन्यापासून एकही कोरोना रुग्ण नसलेल्या कोरोनामुक्त गावातली इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
यासाठी ग्रामपंचायतीसह पालकांची सहमती आली तरच शाळा सुरू होणार आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या ४४४ शाळा कोरोनामुक्त असून, या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात शाळा सुरू होऊ शकतात. यासाठी जिल्हा प्रशासनाने गावांमध्ये सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समित्या स्थापन करण्यात आल्या असून, पुढील एक-दोन दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांची एनओसी आलेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्यात येईल.
चौकट
जिल्ह्यातील एकूण शाळा : ५३५३
शासकीय शाळा : ३६४८
अनुदानित शाळा : ९९६
विनाअनुदानित शाळा : ७०९
चौकट
जिल्ह्यात एकूण गावे : १४०७
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे : ४४४
चौकट
या तालुक्यातल्या गावांमध्ये नाही एकही कोरोनाग्रस्त
आंबेगाव - १९, बारामती - १६, भोर -१०१, दौंड - १२, हवेली -२२, इंदापूर -२७, जुन्नर-११, खेड -६२, मावळ -६२, मुळशी -२४, पुरंदर- २२, शिरूर- १०, वेल्हा - ५६
----------
जिल्ह्यात सध्या कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीनी परवानगी दिली तर व पालकांनी ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यात साडेचारशेपेक्षा अधिक गावे कोरोनामुक्त आहेत. परंतु अद्याप एकाही गावातून प्रस्ताव आलेला नाही.
---------
शाळा सुरू झाल्या, तरी मुलांना पाठवताना धास्ती
शासनाने कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार तयारी देखील सुरू आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालक म्हणून ना हरकत देऊ देखील, पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळेच शाळा सुरू झाल्या तरी मुलांना शाळांमध्ये पाठवतांना धास्ती कायम आहे.
शुभांगी शेळके, जुन्नर पालक
-------
शासनाच्या आदेशानुसार मागील एक महिन्यात ज्या शाळांमध्ये कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही, अशाच शाळा सुरू करायचे आहेत. त्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केलेली आहे. त्या कमिटीने मान्यता दिली तरच इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करावयाचे आहेत. पुढील एक- दोन दिवसांत ही माहिती उपलब्ध होईल. त्यानुसार शाळा सुरू करण्याचे नियोजन करू.
रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती
--------