मुळशी तालुक्यातील नऊ गावांमध्ये कोरोनाचा नाही एकही रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:08 AM2021-05-24T04:08:57+5:302021-05-24T04:08:57+5:30
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुळशी तालुक्यातील काही गावांनी मात्र योग्य नियोजनाच्या जिवावर कोरोनाला गावापासून दूरच रोखले ...
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुळशी तालुक्यातील काही गावांनी मात्र योग्य नियोजनाच्या जिवावर कोरोनाला गावापासून दूरच रोखले आहे. यामध्ये आंबेगाव, डावजे, संबवे, वडगाव-वाघवाडी, वारक, ताम्हिणी,असदे-वेडे-भोडे व पोमगाव या नऊ गावांनी कोरोनावरती वर्चस्व मिळविले असून, गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आत्तापर्यंतच्या दुसऱ्या लाटेपर्यंत या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्हचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे या गावांमध्ये असलेले गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका,शिक्षिका राजकीय-सामाजिक शेतकरी वर्ग या सर्वांनी मिळून 'माझे गाव माझी जबाबदारी' या धोरणावर भर देत आपल्या गावामध्ये कोणाला कोरोना होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. यामुळेच कोरोनाच्या महाभयंकर अशा पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्येसुद्धा ही नऊ गावे अजूनही कोरोनाच्या संसर्गापासून शाबूत राहिली आहेत.
या सर्व नऊ गावांच्या यशामध्ये आंबेगावचे ग्रामसेवक पूजा शिंदे, सरपंच उषा नानासाहेब मारणे, उपसरपंच तानाजी मारणे, डावजेचे ग्रामसेवक मोना सपकाळ, सरपंच रामदास मानकर, संबवेगावचे ग्रामसेवक वासनिक,सरपंच रेश्मा जोरी,उपसरपंच हनुमंत जोरी,वडगाव वाघवाडी ग्रामसेवक प्रशांत सूर्यवंशी सरपंच अर्चना वाघ,वारकचे ग्रामसेवक नीलिमा भुजबळ सरपंच शिल्पा पोकळे,ताम्हिणी-आदरवाडीचे ग्रामसेवक भरत शिरसाट सरपंच प्रियंका मरे उपसरपंच योगेश बामगुडे,असदेचे ग्रामसेवक लक्ष्मण साळवी सरपंच नरेश भरम,वेडे-भोडेचे ग्रामसेवक बी. टी. पाटील, सरपंच संगीता मारणे,पोमगावचे ग्रामसेवक तुकाराम मोरे सरपंच सारिका ढोरे या सर्वांचे व ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे