रिमझिम पावसातही शहरात साचली डबकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:19 PM2018-08-16T23:19:45+5:302018-08-17T00:22:03+5:30
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बारामती शहरात सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन उघडे पाडले आहे.
बारामती - दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बारामती शहरात सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन उघडे पाडले आहे.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर डबकी साचल्याने नगरपालिकेने पाण्याच्या निचऱ्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या का, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शहरासह तालुक्यात पावसाने दडी मारली होती. दोन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर श्रावण महिन्यात बारामती शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाने मात्र नगरपालिकेचा ढिसाळ कारभार उघडा पाडला आहे.
पादचा-यांना शोधावी लागते वाट
शहरातील गणवडी चौक, इंदापूर चौक, बसस्थानकाच्या समोरील परिसर, इंदापूर रस्ता, बाजार समिती चौक आदी भागांत पावसाच्या पाण्यामुळे डबकी साचल्याचे चित्र होते. वाहनचालकांना तसेच पायी जाणाºया नागरिकांना या डबक्यांमधूनच वाट शोधावी लागत होती. सकाळी अकराच्या सुमारास शहरात जोरदार श्रावणसरी कोसळल्या. यानंतर दिवसभर पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सकाळच्या वेळी रिमझिम पावसामुळे नोकरदार, विद्यार्थी यांची तारांबळ उडाली.