राष्ट्रीय कवींचा तुलनात्मक अभ्यास व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:00+5:302021-02-14T04:11:00+5:30
पुणे : राष्ट्रीय कविता लिहिणाऱ्या कवींमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिभा उत्तुंग आहे. ऐतिहासिक राष्ट्रीय कवितेच्या प्रकाशात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ...
पुणे : राष्ट्रीय कविता लिहिणाऱ्या कवींमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिभा उत्तुंग आहे. ऐतिहासिक राष्ट्रीय कवितेच्या प्रकाशात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता अभ्यासल्या पाहिजेत. महादेव कुंटे, विनायक करंदीकर यांच्या मराठी राष्ट्रीय कवितेची परंपरा सावरकरांनी पुढे नेली. सावरकरांसोबत सर्वच राष्ट्रीय कवींचा तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे, असे प्रतिपादन कवी प्रदीप निफाडकर यांनी केले.
रसिक मित्र मंडळ आयोजित ‘एक कवी, एक भाषा’ या व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर-एक कवी’ या विषयावर निफाडकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर उपस्थित होते. या व्याख्यानमालेतील हे ६७ वे व्याख्यान होते. रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांच्या हस्ते यावेळी रणजित सावरकर यांचा सत्कार करण्यात आला.
निफाडकर म्हणाले, “सावरकरांना लहानपणापासून काव्याची आवड आणि प्रतिभा होती. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते अशा ठराविक कवितांपलीकडे जाऊन सावरकर हे संवेदनशील, रोमँटिक काव्य लिहिणारे देखील कवी होते. देशावर लेखन हा देखील रोमँटिसिझमचा प्रकार आहे. ‘तनुवेल’, ‘लगट अंगाला’ सारख्या तरल कविता या सावरकरांच्या रोमँटिसिझमची साक्ष आहेत.” मोरोपंताचा प्रभाव सावरकरांवर होता. मात्र, यमकांचा अट्टहास त्यांनी टाळला. कवितेच्या १०,४८८ ओळी त्यांनी लिहिल्या, हाही विक्रम म्हणावा लागेल, असे ते म्हणाले.