भूजल पुनर्भरणाची लोकचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:08+5:302021-06-01T04:09:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भविष्यात पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यावरचा प्रभावी उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण. त्यामुळेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भविष्यात पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यावरचा प्रभावी उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण. त्यामुळेच या कार्यक्रमाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी या विषयावर वेबिनार झाला. सरकारी संस्थांबरोबरच वनराई, पुणे (अमित वाडेकर), पाणी पंचायत, पुणे (कल्पना साळुंखे), विज्ञानाश्रम, पाबळ (डॉ. योगेश कुलकर्णी), तसेच अटल भूजल योजनेतील समाविष्ट गावांचे आमंत्रित सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यात सहभागी झाले होते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वागत व प्रास्तविक केले. विंधनविहीर व विहीर पुनर्भरण यावर हनुमंत ढोकळे, मिलिंद कुळकर्णी यांनी ग्रामीण तसेच शहरी भागात व औद्योगिक क्षेत्रात विंधन विहिरीद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने भूजल पुनर्भरण करण्याबाबत सादरीकरण व मार्गदर्शन केले.
भूवैज्ञानिक डॉ. प्रमोद रेड्डी यांनी अटल भूजल योजनेची माहिती दिली. डॉ. मिलिंद देशपांडे यांनी विंधनविहीर व साधी विहीरद्वारे भूजल पुनर्भरणबाबत सूचना केल्या.
भूजल पुनर्भरण ही चळवळ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सरकारी यंत्रणा आवश्यक ते सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य करण्यासाठी सदैव सज्ज आहे, असे डॉ. कलशेट्टी व डॉ. देशपांडे यांंनी सांगितले.