'लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना', या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत; पुण्यात लसीकरणाची आकडेवारी १०० च्या आतच!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 01:54 PM2021-07-20T13:54:19+5:302021-07-20T13:58:17+5:30
पुणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४३ गर्भवतींचे, औंध जिल्हा रुग्णालयात ७ तर ससून रुग्णालयात ४ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे.
पुणे : मागील आठवड्यापासून गर्भवतींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट आणि कोरोना लसीकरणासाठी असलेल्या ‘राष्ट्रीय तज्ज्ञ गटा’च्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने गरोदर महिलांना ‘कोव्हिड-१९’ लसीकरणात समाविष्ट केले आहे. लसीकरणाबाबत गर्भवतींमध्ये अजूनही काहीसा संभ्रम पहायला मिळत आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४३ गर्भवतींचे, औंध जिल्हा रुग्णालयात ७ तर ससून रुग्णालयात ४ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे.
इतरांच्या तुलनेत गर्भवतींना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे आजवरच्या अभ्यासातून सिध्द झाले आहे. गर्भावस्थेत रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कोरोनाची संसर्ग तीव्र असल्यास अर्भकावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवतींनी लस घेण्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र, गर्भावस्था हा आयुष्यातील अत्यंत नाजूक टप्पा असल्याने लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना, या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत असल्याचे दिसत आहे.
गर्भवस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये उलटी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसतात. या काळात अशक्तपणाही आलेला असतो, बरेचदा भूक लागत नाही. तब्येतीच्या तक्रारींमुळे आधीच जीव घाबरा झालेला असतो, त्यातून लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी अशा त्रासाची भर पडू नये, अशी भीती गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये दिसून येत आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलून गर्भवतींनी आपल्या सर्व शंकांचे निरसन करुन घ्यावे आणि लसीचा थोडा त्रास झाल्यास काय करावे, याबाबतही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मात्र लस घेण्याबाबत विनाकारण गैरसमज बाळगू नयेत, असे आवाहन केले जात आहे.
गर्भवतींचे लसीकरण
पुणे मनपा : ४३
औैंध जिल्हा रुग्णालय : ७
ससून रुग्णालय : ४
मला सध्या चौथा महिना सुरु आहे. लग्नाला पाच वर्षे झाली. दोन वर्षांपूर्वी गर्भपात झाला होता. त्यामुळे आता गर्भधारणा झाल्यापासून खूप जपावे लागते. लस घेतल्यावर मला आणि बाळाला काही त्रास होणार नाही ना, अशी भीती वाटते. माझ्या डॉक्टरांनी लस घेणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. मात्र, मी स्वत: आणि कुटुंबातील सदस्यही अद्याप माझ्या लसीकरणाबाबत निश्चित निर्णय घेऊ शकलेलो नाही. असे गर्भवती महिला अनिता बिनिवाले यांनी सांगितले.
गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत लस घेता येणार :- डॉ. नीलम दिक्षित, प्रसुती विभागप्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय
गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत लस घेता येऊ शकते. कोरोनाची लागण झाल्यास निर्माण होणा-या धोक्यांबाबत महिलांचे समुपदेशन केले जाते. लसीकरणाआधी हाय रिस्क फॅक्टर किंवा सहव्याधी आदींची माहिती घेतली जाते. गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली असेल तर कोरोनामुक्त झाल्यावर तीन महिन्यांनी किंवा प्रसुतीनंतर लसीकरण होऊ शकते. लसीकरणानंतर सौम्य ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास योग्य औषधोपचार डॉक्टरांकडून सुचवले जातात.