सतारवादनात अजूनही खूप काम करायचेय : उस्ताद उस्मान खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:24+5:302021-01-25T04:10:24+5:30
पुणे : आजवर कला क्षेत्रात केलेल्या कामाला पुरस्काराची पोचपावती मिळाल्यामुळे चैतन्य वाढले आहे. सतार वादनात अजूनही वय आड येत ...
पुणे : आजवर कला क्षेत्रात केलेल्या कामाला पुरस्काराची पोचपावती मिळाल्यामुळे चैतन्य वाढले आहे. सतार वादनात अजूनही वय आड येत नाही. कारण अद्यापही खूप काम करायचं बाकी आहे. सतार वादनाने मला जगभर नावलौलिक मिळवून दिला, अशी भावना ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांनी शनिवारी (दि.23)व्यक्त केली.
गानवर्धन संस्थेतर्फे सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबीयांना ‘स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार’ सिंबॉयोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान केला. निवृत्त प्राध्यापक नारायणराव टिळक यांच्यातर्फे दिवंगत पत्नी गायिका स्वरगंधा टिळक यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार पुरुस्कृत आला. उस्मान खान यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सन्मानही करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, सचिव रवींद्र दुर्वे, उस्मान खान यांच्या पत्नी नूरजहाँ आदी उपस्थित होते.
माझ्या कुटुंबीयांना हा पुरस्कार मिळाला ही अभिमानाची गोष्ट आहे. कुटुंबात सतारवादकांच्या पिढीची परंपरा आहे. प्रत्येक पिढीने हा वारसा जपला आहे असे सांगून, सध्या काही गावांमध्ये संगीताचे प्रशिक्षण दिले जात नाही. ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत संगीत पोचले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजलेला एक सतार वादक कलाकार पुण्यात येऊन स्थायिक झाला, ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, ज्या प्रमाणात त्यांच्या योगदानाची दखल घ्यायला हवी होती ती घेतली गेलेली नाही. संगीत क्षेत्रात एवढे योगदान दिलेल्या व्यक्तीला शासनाने पद्म पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी मी वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर करणार आहे.
यावेळी भारतातील विविध ठिकाणी असलेले त्यांच्या कुटुंबातील सतारवादक रईस खान, हाफीज बाले खान, छोटे रहिमत खान, रफीक खान, शफीक खान, मोहसीन, कन्या रुकैया आणि नात मध्यमी या सर्व कलाकारांनी ‘सतार संध्या’ या कार्यक्रमाद्वारे रसिकांची मने जिंकली.
------