दावडीतील तलाठी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:13+5:302021-06-05T04:08:13+5:30
दावडी : येथील तलाठी कार्यालयात तलाठी येत नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहे. तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी ...
दावडी : येथील तलाठी कार्यालयात तलाठी येत नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहे. तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नियमित न येणाऱ्या तलाठी व कोतवाल यांना नागरिक वैतागून गेले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही कुठलीही सुधारणा होत नसल्यामुळे वरिष्ठांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठे दावडी गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १० हजारांच्या आसपास आहे. गावाला अनेक वाड्यावस्त्या जोडल्या असल्यामुळे शेतकरी व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने गावात तलाठी कार्यालय उघडले आहे. येथे कार्यरत असलेले तलाठी कर्तव्य बजावत नसल्यामुळे कामे खोळंबली असून, नागरिकही हैराण झाले आहेत. तलाठी कार्यालयाच्या परिसरात, ‘तलाठी भाऊसाहेब व कोतवाल दिसले का’, अशी शेतकरी विचारणा करताना दिसतात. तलाठी व कोतवाल आपल्या कर्तव्यात कसूर करीत असून कार्यालयात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोतवालही कार्यालय उघडत नाही शिवाय शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. शेतकऱ्यांना सातबारा वेळेवर मिळत नसून वारसनोंदींची कामे खोळंबली आहेत. ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे, दाखले मिळत नाही.
दिवसभर नागरिक व शेतकरी तलाठी कार्यालयासमोर थांबून तलाठी येण्याची वाट पाहतात. मात्र तलाठी मात्र कार्यालयातच फिरकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. काही दिवसात माॅन्सून सुरू होईल. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी धडपडत आहेत. पीककर्ज मिळण्यासाठी सातबारावरील फेरफार, सातबारा दुरुस्ती आदी कामे करावी लागतात. परंतु या कामासाठी तलाठीच नसल्याने तसेच कोतवालही कार्यालय उघडत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध खोदकाम वाढत आहे. डोंगर, टेकड्या भुईसपाट होत आहे. याच्यावर नियंत्रणही नाही. या परिसरातून अवैधरित्या मुरूम, मातीची वाहने धावत असतात. तसेच महसूल वसुलीचे प्रमाणही कमी आहे. .............................................................
दावडी गावात तलाठी वेळेवर भेटत नसल्यामुळे नागरिकांना सातबाराचे उतारे दुरुस्ती वेळेवर होत नाही. एकूण जमिनीचा दाखला व इतरही प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नाही. वारस नोंदीची कामे रखडली आहेत. तलाठी कार्यालय कधी उघडे तर कधी बंद असते. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात.
संतोष सातपुते, सदस्य, ग्रामपंचायत, दावडी
०४ दावडी
दावडी (ता. खेड) येथील बंद असलेले तलाठी कार्यालय.