पशुवैद्यकीय दवाखाना असून अडचण नसून खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:07+5:302021-04-08T04:10:07+5:30
--- महूडे : भोर तालुक्यातील डोंगरी भागात शिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अनेक महिन्यांपासून केवळ नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्याने ...
---
महूडे : भोर तालुक्यातील डोंगरी भागात शिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अनेक महिन्यांपासून केवळ नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील जनावरांवर योग्य उपचार होत नाही. शिवाय कपांउंडर पद भरले असल्यामुळे हा दवाखाना बंद अवस्थेतही नाही. त्यामुळे हा दवाखान्याची असून अडचण नसून खोळंबा, अशी गत झाली आहे. मात्र योग्य व वळेत उपचार मिळत नसल्यानेच येथील धोडिंबा खुटवड यांची गाय केवळ दगावली त्यामुळे गावात प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे.
या परिसरातील शेतकरी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून जनावरे पाळतात. परंतू येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने शिंद आणि परिसरातील आजारी जनावरांवर उपचार कोण आणि कधी करणार यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैधकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
महुडे खोऱ्यातील शिंद हे श्री वीर बाजी प्रभूंचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात पशुधन ही भरपूर आहे. यामुळे या परिसरातील नांद, नांद (वरचे) शिंद, नानाचीवाडी, सुभेदारवाडी, गवडी , कीवत गावच्या पशुपालक पशुवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी येथे येतात.
या परिसरातील पशुपालक जनावरे पाळायची कि नाही या द्विधा मनस्थिती आहे. शिंद येथील दवाखान्याला एक कंपाउंडर आणि एक पशुवैद्यकीय अधिकारी अशी दोन पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ कंपाऊंडरचे पद भरले असून पशुवैद्यकीय अधिकारपदी मात्र अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. या गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पशुवैद्यकीय दवाखाना नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे व त्यांच्या जनावरांचे हाल सुरु आहेत. अखेर दूर का होईना मात्र खासगी डॉक्टरांकडे जाऊन जनावरांवर उपचार करावे लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
--
कोट -१
माझी सत्तर हजारांची गाय काल मरण पावली ती केवळ गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्यानेच. गायीच्या उपचारासाठी खासगी डॉक्टर बोलावले होते ते येण्यास वेळ लागतो तर काही वेळेस दुसऱ्या गावात जातात फोन लागत नाही, अशा सर्व घटना घडत असतात. या दवाखान्यात जर कायमस्वरूपी डॉक्टर असते तर त्या जनावराला वेळेत उपचार मिळाले असते माझे न भरून येणारे नुकसान झाले नसते. गावात नावालाच पशुवैद्यकीय दवाखाना आहे या दवाखान्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
धोंडीबा खुटवड,
पशुपालक, शिंद
--
कोट -२
माझ्या गायीचा गर्भपात झाला पण स्थानिक दवाखान्यात डॉक्टर नसल्याने खासगी डॉक्टरला विनंती करून बोलवावे लागत होते. त्या गायीचा जीव वाचविण्यासाठी भरपूर पैसे खर्च झाला शिवाय मानसिक त्रास ही सहन करावा लागला.
अंकुश काळे,
पशुपालक, शिंद
---
०७ महुडे पशुवैद्यकीय दावाखाना