राजर्षी शाहू महाराज अन् लोकमान्य टिळकांमध्येही व्हायचे वाकयुद्ध; अंतर्मनात परस्परांबद्दल जिव्हाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 01:21 PM2023-05-06T13:21:15+5:302023-05-06T13:21:35+5:30
लोकमान्य टिळकांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शाहू महाराजांनी जेवणाचे ताट बाजूला सारले आणि माझा इतका मोठा विरोधक गेला, असे म्हणत त्यांनी शोक पाळला
राजू इनामदार
पुणे : राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची शनिवारी (दि. ६) सांगता झाली. शाहू महाराजांनी कोल्हापुरातून देशभर सामाजिक सुधारणांचा डंका वाजवला; तर लोकमान्य टिळकांनीपुणे शहरातून राजकीय स्वातंत्र्याचा नारा दिला. शाहू महाराज पुण्यात कायम येत असत, मुक्काम करत. पुण्यातून तत्कालीन अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबर महाराजांचे निकटचे संबंध होते. त्यात लोकमान्य टिळक व त्यांचे सहकारीही होते.
कोल्हापुरातील वेदोक्त प्रकरणात (महाराज क्षत्रिय नाहीत, असे समजून त्यांना वेदमंत्रांचे अधिकार नाकारणे) लोकमान्य टिळकांनी महाराजांना क्षत्रियत्व नाकारणाऱ्यांची बाजू घेतली आणि त्यानंतर या दोन्ही व्यक्तिमत्त्वांमधील संघर्षाला धार चढली. ती नंतर वाढतच गेली. त्यातच मग अनेक गोष्टी घडू लागल्या. दोन्हीकडची मंडळी तत्कालीन वर्तमानपत्रे, जाहीर सभा, मेळे, उत्सवांमधील व्याख्यानमाला यातून एकमेकांवर तुटून पडत. आरोप-प्रत्यारोप होत.
खुद्द शाहू महाराज व लोकमान्य यांच्यातही वाकयुद्ध व्हायचे. समकालीन असणाऱ्या या दोन थोर व्यक्तिमत्त्वांमध्ये वितुष्ट होते, असे त्यामुळेच सांगण्यात येते. मात्र आता १०० वर्षांनंतर काही गोष्टींकडे मागे वळून पाहताना ‘बहिर्यामी वितुष्ट व अंतर्यांमी ममत्व ’असे त्यांच्या संबधांचे स्वरूप असल्याचे दोघांच्याही चरित्राचे अभ्यासक सांगतात. काही पत्रे, काही लेख तसेच काही तर्क आता इतक्या वर्षांनंतर अभ्यासकांच्या या म्हणण्याला पुष्टी देतात. दोघेही परस्परांचे महत्त्व ओळखून होते, त्यामुळेच परस्परांचा आदरही करत असत. शाहू महाराजांच्या लेखी पत्रांमधून ही गोष्ट उघड होते. लोकमान्यांनाही शाहूंबद्दल ममत्व होते, असे दाखवणाऱ्या काही गोष्टी आहेत.
टिळकांच्या आजारपणात शाहूंचे पत्र
लोकमान्य टिळकांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शाहू महाराजांनी जेवणाचे ताट बाजूला सारले. माझा इतका मोठा विरोधक गेला, असे म्हणत त्यांनी शोक पाळला, हे सर्वश्रुत आहे, मात्र महाराजांनी टिळक आजारी आहे, असे समजल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्रीधरपंत यांना एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी टिळकांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना पन्हाळ्यावर विश्रांतीसाठी घेऊन या, अशी सूचना केली होती. एका डॉक्टरांचे नावही सुचवले होते. दर दोन दिवसांनी लोकमान्यांच्या प्रकृतीची माहिती तारेने कळवावी, असेही त्यांनी याच पत्रात सांगितले होते. टिळक गेले त्यादिवशी त्यांनी उपवास केला. दुखवटा जाहीर केला. १० दिवसांनंतर टिळकांच्या निवासस्थांनी तत्कालीन रूढीप्रमाणे वस्त्रे पाठवली. ममत्व असल्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत. दोघेही एकत्र आले असते, तर महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या इतिहासाला वेगळेच वळण मिळाले असते. - प्रा. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक, राजर्षी शाहू अभ्यासक
भुरट्या संशोधकांकडून दोघांवरही अन्याय
शाहू महाराजांच्या राज्यरोहणानंतर केसरीत ‘कपिलाषष्ठीचा योग’ असा अग्रलेख होता. वेदोक्त प्रकरणानंतर ‘वेदोक्ताचे खूळ’ असा अग्रलेख केसरीत आलेलाच नाही. मात्र तत्कालीन काही अज्ञानी संशोधकांनी तसे म्हटले व त्यानंतर इतरांनी कसलाच अभ्यास न करता त्याचीच री ओढली. लोकमान्य टिळकांना शाहू महाराजांचे महत्त्व मान्य होते, असे स्पष्ट करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. लोकमान्यांना तत्कालीन समाजाला बरोबर घेऊन राजकीय सुधारणा हव्या होत्या, तर राजर्षी शाहूंना सामाजिक सुधारणांची गरज वाटत होती. हा संघर्ष असलाच तर तात्त्विक होता. त्यामुळे दोघेही एकमेकांचे द्वेष करत, असे जे चित्र नंतरच्या काळात उभे केले गेले, ते दोघांवरही अन्याय करणारे आहे. त्याचे निराकरण करणाऱ्या गोष्टी आता प्राधान्याने पुढे आणायला हव्यात. - वासुदेव कुलकर्णी - निवृत्त पत्रकार व टिळक अभ्यासक.