पुण्याच्या जागेबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 01:58 AM2019-01-20T01:58:10+5:302019-01-20T01:58:17+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी नक्की झाली, मात्र पुणे लोकसभेच्या जागेचा गोंधळ अजून कायम आहे.

There was confusion in Congress about the wake of Pune | पुण्याच्या जागेबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम कायम

पुण्याच्या जागेबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम कायम

Next

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी नक्की झाली, मात्र पुणे लोकसभेच्या जागेचा गोंधळ अजून कायम आहे. चर्चा सुरू असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक व कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वातीन लाख मतांच्या फरकाने काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाची फरतफेड करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने जागेचा तिढा उभा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे असे सांगत कार्यकर्त्यांच्या महत्त्त्वाकांक्षा चाळवल्या आहेत.
जिल्ह्यातील मावळ, शिरूर, बारामती व पुणे असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातील तीन राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. पुणेही त्यांच्याकडे गेले तर काँग्रेसचे अस्तित्वच राहणार नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या शहर शाखेने आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड व पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांची नावे निश्चित करून प्रदेशकडे पाठवूनही दिली आहेत.
काँग्रेसमधील उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षातीलही इच्छुक आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेतली. शरद पवार यांच्याकडेही ते गेले होते. ‘आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण बाहेरचे कोणी लादू नका’ असा ठरावच शहर शाखेने प्रदेशला पाठवला आहे. तरीही प्रदेशाध्यक्ष चव्हाण अजून चर्चा सुरूच असल्याचे सांगत असल्याने इच्छुक चिंतीत आहेत.
‘लोकमत’ शी बोलताना चव्हाण म्हणाले, ‘‘वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणाला असे आताच सांगता येणार नाही. चर्चेला अद्याप अंतिम स्वरूप आलेले नाही. एखाद्याच जागेबाबत वाटाघाटी सुरू असताना जाहीरपणे बोलणे योग्य नाही. जुने नवे पदाधिकारी, इच्छुक यांचे म्हणणेही विचारात घेतले जाते.’’ चव्हाण यांच्या असे बोलण्यामागे बाहेरचा उमेदवार किंवा मागील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आमदार विश्वजित कदम यांचा आग्रह असावा असा येथील पदाधिकाºयांचा अंदाज आहे. दरम्यान शहर काँग्रेसची उद्या (रविवारी) दुपारी १ वाजता काँग्रेस भवनमध्ये निवड समितीची बैठक होत आहे. शहराध्यक्ष, सर्व आजी-माजी आमदार, शहरातील प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचा समितीमध्ये समावेश असतो. शहर शाखेच्या बैठकीत निश्चित केलेली उमेदवारांची नावे निवड समितीच्या बैठकीतून प्रदेशला पाठवावी लागतात. त्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
>बोलणे योग्य नाही
आघाडीसंबंधीच्या चर्चा अजून सुरू आहेत. त्यात जागावाटप विषय आला असला तरी त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही. चर्चा सुरू असताना एखाद्या जागेवरून काही बोलणे योग्य नाही. काही जागांबाबत ते व आम्ही अशा दोघांकडून मागणी आहे हे खरे आहे, मात्र तो आघाडीतंर्गत मुद्दा आहे. त्यावर जाहीर वक्तव्य करणे बरोबर नाही.
अशोक चव्हाण,
प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
>जागा काँग्रेसकडेच राहील
पुणे शहर लोकसभा हा मतदारसंघ स्थापनेपासून अगदीच एखाददुसरा अपवाद वगळता काँग्रेसकडे आहे. मागील वेळी भाजपाचा येथील विजय अपघातानेच व मोदी लाट होती म्हणून झाला आहे. आघाडी झाली तरी मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार याची खात्री आहे. शहर काँग्रेसची तशी आग्रही मागणी आहे. उमेदवारी ही पक्षांतर्गत बाब आहे.
मोहन जोशी- माजी आमदार व लोकसभा इच्छुक
>काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
जिल्ह्यातील लोकसभेच्या एकूण ४ पैकी ३ मतदारसंघ राष्ट्रवादी काँगे्रेसकडे आहेत, त्यात पुन्हा पुण्याचाही मतदार संघ राष्ट्रवादीकडे गेल्यावर काँग्रेसचे अस्तित्वच राहणार नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सर्व इच्छुकांनीही आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण बाहेरचे कोणीही लादू नका, असा ठरावच पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे.

Web Title: There was confusion in Congress about the wake of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.