या गाड्यांमध्ये नव्हती कसली व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:16 AM2021-02-21T04:16:39+5:302021-02-21T04:16:39+5:30
जुन्नर ते महाबळेश्वर व्हाया स्वारगेट एमएच ४० एन ९५३० पिंपरी-चिंचवड ते चिपळूण एमएच ९ एफएळ ०५८० स्वारगेट ते सातारा ...
जुन्नर ते महाबळेश्वर व्हाया स्वारगेट
एमएच ४० एन ९५३०
पिंपरी-चिंचवड ते चिपळूण
एमएच ९ एफएळ ०५८०
स्वारगेट ते सातारा
एमएच ११ डीएल ९३०९
प्रत्येक गाडीत आगीला प्रतिबंध करणारा सिलिंडर असलाच पाहिजे हा नियम आहे. महामंडळाकडून प्रत्येक गाडीला असा सिलिंडर देण्यातही येतो. मात्र आग लागल्यावर त्याचा वापर कसा करायचा याची ना चालकाला माहिती आहे ना वाहकाला!
प्रथमोचार पेटीचेही तेच आहे. त्यातील वेगवेगळी मलमे, जंतूनाशक औषधे यांनाही विशिष्ट मुदत असते. मात्र त्याचीही कोणाला माहिती नाही. ही पेटी वाहकाच्या जवळ असावी किंवा आतील बाजूने समोरच्या बाजूला ती दिसले अशी लावणे अपेक्षित आहे. बहुतेक गाड्यांमध्ये अशी पेटी नसतेच. का नाही असे विचारल्यावर एका वाहकाने, १०८ क्रमाकांला फोन केला तर लगेच रुग्णवाहिका येते, मग काय करायची पेटी असे उत्तर दिले. पेटीसाठी जागा आहे, पण पेटी नाही अशीच महामंडळाच्या बहुतेक वाहनांची अवस्था आहे.
काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने त्यांच्या प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांना वाय-फाय सुविधा मिळेल, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे एका कंपनीला ते कंत्राट देण्यात आले. आता त्यांच्याबरोबरचा करार संपला, त्याला महिने लोटले. एसटीतील वाय-फाय मात्र बंदच आहे. यावरही एका वाहकाने, करायचे काय ते वाय-फाय, आता प्रत्येकाजवळ नेट असतेच असे सांगितले.
स्थानकात आतमध्ये विडी-सिगारेट विक्रीला मनाई आहे. त्याचे पालन कसोशीने होताना दिसले. स्थानकाच्या आवारात विडी-सिगारेट ओढताना कोणी दिसला नाही. मात्र ती कसर स्वच्छतागृहात भरून काढलेली दिसते. तिथे थोटके पडलेली असतात.
सुरक्षेच्या बाबतीत मात्र तिन्ही आगारे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच आहेत. गणवेशातील कोणीही प्रवेशद्वारावर नाही. स्थानकांमध्येही कोणी फिरताना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावरून खासगी प्रवासी वाहतूक व्यावसायिकांपासून ते रिक्षाचालकांपर्यंत कोणीही स्थानकांमध्ये फिरून थेट प्रवाशांना घेऊन जातात.
---------------
आम्ही वाहक व चालक अशा दोघांनाही सिलिंडर कसा वापरायचा याचे प्रशिक्षण दिले आहे. मुदत संपलेले सिलिंडर जमा करून ते कार्यशाळेमधून रीफिलिंग करून आणले जातात. प्रथमोपचार पेटीची जबाबदारी वाहकाकडे असते. मात्र त्याचा वापर होत नाही व त्यातील औषधांची मुदत तशीच संपून जाते, असा अनुभव आहे. वायफाय सुविधा कोरोना टाळेबंदीच्या आधी कंपनीबरोबरच्या कराराची मुदत संपल्यामुळे सध्या अस्तित्वात नाही.
सचिन शिंदे- वरिष्ठ आगार व्यवस्थापक, स्वारगेट