पैशांचा पाऊस नाही पडला, पण ५२ लाखांना ‘चुना’ लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:58+5:302021-06-04T04:08:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावकारी करणाऱ्या व्यावसायिकाला एका मित्राने एका मांत्रिकाची माहिती दिली. तो पैशांचा ‘पाऊस’ पाडून देतो, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावकारी करणाऱ्या व्यावसायिकाला एका मित्राने एका मांत्रिकाची माहिती दिली. तो पैशांचा ‘पाऊस’ पाडून देतो, असे भासविले. पैशाच्या हव्यासापायी व्यावसायिकाने तब्बल ५२ लाख रुपये दिले. पण पैशांचा पाऊस काही पडला नाही. मांत्रिकाने आणखी पैशांची मागणी केल्याने सावकाराला मानसिक धक्का बसला. शेवटी त्याने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर चक्रे फिरली आणि जालना जिल्ह्यातून या भोंदू तांत्रिकाला पोलिसांनी सापळा रचून पकडले.
किसन आसाराम पवार (वय ४१, रा. हिवरखेड, ता़ मंठा, जि. जालना) असे या मांत्रिकाचे नाव आहे. याप्रकरणी धायरीतील गणेशनगर येथील ४० वर्षांच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांना त्यांच्या एका मित्राने जालन्यातील एक मांत्रिक पैशाचा पाऊस पाडत असल्याचे सांगितले. किसन पवार हा नेहमी पुण्यात येत असे. सन २०१६ च्या दरम्यान फिर्यादीने त्याची भेट घेतली. त्यावेळी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी त्याने माहिती दिली. पैशांच्या पाऊस पाडण्यासाठी आपल्याला छोटी पूजा करावी लागेल आणि पूजेसाठी काही पैसे पूजेत ठेवावे लागतील, असे सांगितले. मित्राचे म्हणणे आणि पवार याचा अविर्भाव पाहून फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला.
पवारने स्वत:मध्ये दैवीशक्ती असून चमत्कार करण्याचा दावा केला. फिर्यादीने त्याच्याकडून वेळोवेळी थोडे-थोडे करून तब्बल ५२ लाख १ हजार रुपये दिले. तरी अखेपर्यंत पैशाचा पाऊस काही पडला नाही. त्यामुळे फिर्यादीने पैसे देणे बंद केले. त्यानंतर पवारने तुमचे काम झाले आहे परंतु, एक शेवटचा विधी राहिला असून तो तुम्हाला करावा लागेल, असे सांगितले. त्याचा फिर्यादीला मानसिक धक्का बसला. त्यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली. गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले. त्यांनी किसन पवारची माहिती काढली.
तो जालना जिल्ह्यातील गावी असल्याचे समजल्यावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक बनावट ग्राहक तयार केला. पवारबद्दल खात्री पटल्यावर पोलिसांनी छापा टाकून त्याला पुण्यात आणून अटक केली. किसन पवारने आणखी काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. संबंधितांनी गुन्हे शाखेकडे माहिती द्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. ही कामगिरी युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, अंमलदार दीपक मते, महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, संदीप तळेकर, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, सुजित पवार, संतोष क्षीरसागर, विल्सन डिसोझा, कल्पेश बनसोडे, रामदास गोणते, सोनम नेवसे यांनी केली आहे.