काही क्षणात होत्याचे नव्हते झाले
By admin | Published: September 4, 2016 04:09 AM2016-09-04T04:09:37+5:302016-09-04T04:09:37+5:30
थेरगाव दत्तनगर येथील रोडे चाळीत एका खोलीत २६ आॅगस्टला दुर्दैवी घटना घडली. आई दीपाली गॅस पेटवण्यास गेली. अचानक गॅसचा भडका झाला. त्यात तिच्यासह अंथरुणातील
वाकड : थेरगाव दत्तनगर येथील रोडे चाळीत एका खोलीत २६ आॅगस्टला दुर्दैवी घटना घडली. आई दीपाली गॅस पेटवण्यास गेली. अचानक गॅसचा भडका झाला. त्यात तिच्यासह अंथरुणातील दोन लेकरेदेखील आगीत होरपळुन निघाली. नियतीच्या या खेळात अवघे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, या घरातील कर्ता पुरुष सुनील गारवे त्या दिवशी गावी गेल्याने बचावले आहेत. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. दु:खाचा डोंगर कोसळल्याची ही घटना हदय पिळवटून टाकणारी आहे.
सर्वांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, त्याच दिवशी उपचार सुरू असताना दोन वर्षांच्या साईप्रसादचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने कुटुंबावर आघात झाला. तिसऱ्या दिवशी २९ आॅगस्टला आई दीपालीची सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आईने जगाचा निरोप घेतल्यानंतर ३० आॅगस्टला ८ वर्षांच्या विठ्ठलानेही प्राण सोडला. आईसह दोन भावंडांनी जगाचा निरोप घेतला. सहा वर्षांची सानिका रुग्णालयाच्या खाटेवर पडून आहे.
पत्रावजा चाळीच्या खोलीत राहणारे गारवे कुटुंबीय, हातावर पोट असलेल्या या कुटुंबावर सहन करण्याच्या क्षमतेपलीकडील आघात झाला. त्यांच्यावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. आई दीपालीसह दोन वर्षांचा साईप्रसाद, आठ वर्षांचा विठ्ठल आणि सहा वर्षांची ही भावंडे गॅस गळतीच्या स्फोटात भाजली. वडील सुनील गारवे मात्र गावी गेल्याने या दुर्घटनेतून बचावले. पत्नी दीपालीसह दोन चिमुकली काळाने हिरावुन नेली. छोटी सानिका अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहे. मायेने वाढवलेली चिलीपिली एकेक करत काळाने हिरावून नेली. त्यांना मायेची ऊब देणारी, पंखाखाली सामावून घेणारी त्यांची मायसुद्धा सोडून गेली. संकटाला सोमारे जायचे मनोबलही आता उरलेले नाही. अशा हतबलतेच्या गर्तेत सुनील गारवे अडकले आहेत. एखाद्या संकटातून कसेबसे सावरता येते, मनाची समजूत घालता येती. दिवसाआड एक असा एकेक रक्तामासाचा तुकडा काळाने हिरावून नेला. (वार्ताहर)
घटनेचे कारण अस्पष्ट
मयत दीपाली यांनी गॅस गळतीने दुर्घटना घडल्याचा जबाब पोलिसांना दिला असला, तरी हा गॅस स्फोट नसून, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा अहवाल संबंधित गॅस एजन्सीने वाकड पोलिसांकडे सादर केला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार गॅसच्या स्फोटामुळे ही घडली असती, तर सिलिंडर फुटला असता. मात्र, असे काहीही झाले नाही. असे स्पष्टीकरण एजन्सीने दिले आहे. रात्री गॅस शेगडीचे बटन बंद करण्याचे राहून गेल्याने खोलीत गॅस जमा झाला. सकाळी काडी पेटवताच स्फोट झाला. त्यातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघड
झाले आहे.
थेरगावातील ही तिसरी गॅस दुर्घटना
थेरगाव, दत्तनगर परिसरातील शिंदे कुटुंबीयांवर असेच संकट ४ आॅगस्ट २०१४ ला ओढवले होते. शिंदे कुटुंबीयांचे घर गॅस स्फोटात अक्षरश: पत्त्यासारखे कोसळले. घराच्या ढिगाऱ्यातून कुटुंबाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उपचारादरम्यान संजय काळे या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला. समाजातील काही व्यक्तींच्या मदतीमुळे हे कुटुंब सावरले. दोन वर्षांपूर्वी थेरगाव १६ नंबर या परिसरात गॅस दुरुस्ती दुकानात झालेल्या स्फोटत तीन कामगारांना आपले जीव गमवावे लागले होते. अशाच प्रकारे नुकत्याच घडलेल्या घटनेत गारवे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.