पुणे शहरातील गणेशोत्सवात नव्हते एकही '' विनापरवाना '' मंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:27 PM2019-09-19T12:27:10+5:302019-09-19T12:43:35+5:30
पूर्ण उत्सव काळात एकही बेकायदा मंडप आढळला नाही...
पुणे : गणेशोत्सवामध्ये बेकायदा मंडपांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तपासणी पथक नेमले खरे... परंतू या पथकाला पूर्ण उत्सव काळात एकही बेकायदा मंडप आढळला नाही. त्याउलट गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 250 मंडप कमी झाल्याचा अहवालच प्रशासनाने तयार केला असून या अहवालात एकाही मंडळावर कारवाईची शिफारस न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालिकेने मंडप धोरण स्विकारलेले आहे. या धोरणानुसार, सार्वजनिक मंडळांना सार्वजनिक रस्ते, पदपथ, पादचारी मार्गांसह चौकांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात उत्सवकाळासाठी मंडप, कमानी, रनिंग मंडपाची परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना स्थानिक पोलिसांसह वाहतूक शाखेचीही परवानगी दिली जाते. त्यासाठी पालिकेत एक खिडकी योजनाही राबविली जाते. पालिकेने गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीच ऑनलाईन परवाने द्यायला सुरुवात केली होती. पालिकेकडे 1 हजार 996 मंडळांनी ऑनलाईन आणि 135 मंडळांनी ऑफलाईन अर्ज केले होते. ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली आहे.
मंडळांचे मंडप नियमानुसार आहेत की नाही, पालिकेने दिलेले परवाने दर्शनी भागात आहेत की नाही, अधिकृत-अनधिकृत मंडप आहे का हे तपासण्यासाठी तपासणी पथके शासनाच्या परिपत्रकानुसार नेमण्यात आली होती.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नेमण्यात आलेल्या या पथकांमध्ये क्षेत्रीय कार्यालयाचा एक, स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांचा एक प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला होता. या पथकांच्या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या मंडळाविरुध्द कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार होती. परंतू, शहरामध्ये असा विनापरवाना एकही मंडप पथकांना आढळून आला नाही. तसा अहवालच प्रशासनाने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे मंडळांचे कार्यकर्ते सुधारले आहेत की प्रशासनाने केवळ दिखाऊपणा केला आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस मंडळांची संख्या वाढत असतानाच मंडपांची संख्या कमी झाल्याचा दावा फोल असल्याची टिका होऊ लागली आहे.