..इथेच अश्रू अनावर झाले होते : रोहिणी हट्टगंडी झाल्या भावनाविवश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 08:22 PM2019-11-08T20:22:27+5:302019-11-08T20:23:16+5:30
दु:ख अनावर न झाल्याने पडद्यामागे जावून याच व्यासपीठावर रडले होते...
पुणे : एकावन्न वर्षांपूर्वी या जागेवर नाट्यगृह नव्हते. फक्त मोकळी जागा होती.. आणि एका बाजूला व्यासपीठ उभारले होते. माझ्या पहिल्या नाटकाचा प्रयोग सुरू झाला. पहिले दोन अंक झाले आणि पावसाला सुरूवात झाली. प्रयोग बंद पडला. पहिलाच प्रयोग पूर्ण न झाल्याचे प्रचंड दु:ख झाले. हे दु:ख अनावर न झाल्याने पडद्यामागे जावून याच व्यासपीठावर रडले होते. मात्र आज अभिमानाने सांगते. मी जे आहे ते या नाटयगृहामुळेच म्हणूनच मी या नाटयगृहाच्या ऋणात आहे.. अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी ’भरत’च्या आठवणींना उजाळा दिला.
भरत नाट्य संशोधन मंदिर आणि संवाद पुणे यांच्या वतीने पहिल्या संगीत नाटय महोत्सवाचे उदघाटन हट्टंगडी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, कार्याध्यक्ष अभय जबडे, विश्वस्त पांडुरंग मुखडे, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी उपस्थित होते.
हट्टंगडी म्हणाल्या, मंतरलेले पाणी या नाटकात मी पहिली भूमिका केली. या नाटकाचा प्रयोग याच नाट्यगृहात होत होता. मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यावेळी खूप वाईट वाटले होते. मात्र आज अभिमानाने उभी आहे. मनात अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. या नाट्यगृहानेच मला कलाकार म्हणून घडविले.
आनंद पानसे, मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले.रोहिणी हट्टंगडी यांचा परिचय आणि सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले. वृंदा पांगारकर हिने रोहिणी हट्टंगडी यांचे काढलेले चित्र त्यांना भेट दिले. जयदीप कडू, अनघा घारे आणि तनुश्री सोहनी यांचा सत्कार रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते करण्यात आला.
-----------------------------------------------
अन पहिल्या प्रयोगातील मित्र भेटले
सुमारे 51 वषार्पूर्वी टुणटुणनगरी खणखण बाजा या नाटकाचा प्रयोग या नाट्यगृहात पार पडला होता. त्या नाटकातील काही कलाकार संगीत नाट्य संमेलनानिमित्त एकत्र आले होते. त्यात नाट्यगृहाचे अध्यक्ष आनंद पानसे, रोहिणी हट्टंगडी यांचाही समावेश होता. या सर्व कलाकारांनी एकत्र येत 51 वर्षांच्या अतूट नाट्य मैत्रीचा धागा अधिक दृढ केला.