पाणी योजना झाली, पण ठाकरवाडी तहानलेलीच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:00 AM2019-02-20T00:00:11+5:302019-02-20T00:00:27+5:30
ग्रामस्थांची पायपीट: योजना कागदावरच, काम अपूर्णच, समस्या सोडविण्याची मागणी
दावडी : जऊळके खुर्द (ता. खेड) येथील ठाकरवाडीला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची योजना झाली, मात्र पाणी योजनेचे काम अपूर्ण असल्यामुळे वेळेवर पाणी मिळत नाही यामुळे पाणी ग्रामस्थांना जपून वापरावे लागत असल्याचे चित्र आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
पूर्व भागातील जऊळके येथील ठाकरवाडीची लोकसंख्या अडीचशेच्या घरात आहे. येथील महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. डोंगरदऱ्यात असलेल्या झºयातून पाणी आणावे लागते. गेल्या वर्षी जलस्वराज्य या शासनाच्या माध्यमातून नळपाणीपुरवठा योजना झाली. ठाकरवाडी येथे ७ लाख लिटर पाणी साठवणूक होईल अशी टाकी बांधण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे काम ठप्प पडले आहे. तर खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदा म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरातील नदी, धरण, तलाव विहिरी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडे पडू लागतात.
पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यानेच येथील जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. पाणीटंचाईची समस्या अत्यंत गंभीर सुरू झाली असून, अजून उन्हाळ्याचे ३ महिने कसे जाणार, या चिंतेत ग्रामस्थ आहेत. जऊळके येथील ठाकरवाडीचे दुर्दैव म्हणावे लागेल, की नळ योजना असूनही गाव तहानलेलेच आहे. त्यातील पाणी अजून ग्रामस्थांना मिळाले नसल्याचे वास्तव आहे. पाण्याचा टाक्याचे काम, पाईपलाईन व काही किरकोळ कामे रखडली आहेत.
येथील ठाकरवाडीला रोटरी क्लब व इतर संस्थांनी पाणी देण्यासाठी छोटी पाण्याची टाकी बांधली, मात्र येथील विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे तेही पाणी वेळेवर मिळत नाही.
ग्रामस्थांना दोन दिवसातून मिळणारे पाणी जपून वापरावे लागत आहे. तसेच ठाकरवाडीलगत असलेल्या विहिरीतील गढूळ पाणी गाळून घेऊन प्यावे लागत आहे. त्यामुळे महिलांमध्ये व ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. या योजनेचे काम तत्काळ मार्गी लावून आम्हाला पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिक व महिला करीत आहेत.
जलस्वराज्य या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून सुमारे २२ लाख रुपयांचे नळयोजनेचे काम झाले आहे. तसेच या टाकीचे बांधकाम अपूर्ण आहे. ठाकरवाडीकडे जाणाºया लोखंडी पाईपलाईनचा वॉल तुटल्यामुळे पाणी टाकीत जात नाही. लवकरच या वॉलची दुरुस्ती करणार आहे.
- योगेश बोºहाडे, सरपंच,
जऊळके खुर्द, ता. खेड