Pune Corona News: लढाई जिंकतोय; पुणे शहरात बुधवारीही कोरोनाने एकही मृत्यू नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:22 PM2021-10-27T18:22:13+5:302021-10-27T18:22:25+5:30
कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर आता पूर्णपणे मात केली जात असल्याचे संकेत यातून मिळू लागले आहेत
पुणे : शहरात या आठवड्यात बुधवारच्या दिवशी चौथ्यांदा एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. शहराच्या दृष्टीने ही मोठी जमेची बाजू असून, कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर आता पूर्णपणे मात केली जात असल्याचे संकेत यातून मिळू लागले आहेत. दरम्यान या आठवड्यात दररोजची कोरोनाबाधितांची होणारी वाढही शंभरच्या आत राहिली असून, आजही केवळ ९६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ५ हजार ९४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली़ ही टक्केवारी १.७४ टक्के इतकी आहे. तर आज १०४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ८३२ इतकी खाली आली आहे.
लढाई जिंकतोय; पुणे शहरात आजही कोरोना मृत्यू नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 27, 2021
पुणे मनपा हद्दीत कोरोनाबाधित एकही रुग्णाचा आजही मृत्यू झालेला नाही. गेल्या आठवडाभरात शून्य मृत्यू असण्याची ही चौथी वेळ आहे. आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि निरंतर सेवेबद्दल धन्यवादही !
शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १३९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, गंभीर रूग्णांची संख्या ११५ इतकी आहे. आजपर्यंत शहरात ३५ लाख ३० हजार २७ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार १६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर बाधितांपैकी ४ लाख ९४ हजार १११ जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांपैकी बुधवारपर्यंत (दि़२७) ९ हजार ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पुणे शहरातील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसला तरी, पुण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांपैकी २ जण मृत्यू पावले आहेत.