देशभरातील ४ हजार ८८ किल्ले शब्दरूपात येणार; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या शिष्यांची ग्रंथनिर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 03:33 PM2020-02-18T15:33:34+5:302020-02-18T15:36:32+5:30
ऋग्वेद, मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, अर्थशास्त्र व अशा ४३ पेक्षा प्राचीन ग्रंथांमध्ये असलेली किल्ल्यांची माहिती
पुणे : देशाच्या ५२१ जिल्ह्यांमधील ४ हजार ८८ किल्ले व महालांची एकत्रित माहिती असलेला एक ग्रंथ लवकरच मराठीत प्रकाशित होत आहे. किल्ले या एकाच विषयाला आयुष्य समर्पित केलेले दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी त्यांच्या भ्रमंतीत केलेल्या टिपणांवरून त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्याच शिष्यांनी ही ग्रंथनिर्मिती केली आहे. मार्च २०२०मध्ये या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे. या प्रकल्पाचे प्रमुख व भारतीय आरमाराचे प्राचीन काळ ते आतापर्यंतचे अभ्यासक अनिकेत यादव यांनी ही माहिती दिली. दुर्गप्रेमींमध्ये प्रमोद मांडे हे नाव प्रसिद्ध आहे. राज्याप्रमाणेच देशातही त्यांचा वावर होता. भारतातील बहुसंख्य राज्यांमध्ये त्यांनी भ्रमंती केली होती व तेथील किल्ले तसेच महाल पाहून त्याविषयी टिपणे काढली होती. दुर्दैवाने त्यांचे अचानक निधन झाले. अनिकेत यांच्याप्रमाणेच चेतन धाडगे, राहुल पापळ हेही मांडे यांचे शिष्य. मांडे यांची ही टिपणे एक दिवस त्यांच्या हाती लागली व त्यांनी त्याला ग्रंथरूप देण्याचा निश्चय केला. येत्या मार्चमध्ये या ग्रंथाचे प्रकाशन होणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
.........
मांडे यांच्या टिपणांवरून संबंधित स्थळांचा अन्य अभ्यास करून, माहिती जमा करून हा यादव, धाडगे व पापळ यांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे. त्यात ऋग्वेद, मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, अर्थशास्त्र व अशा ४३ पेक्षा प्राचीन ग्रंथांमध्ये असलेली किल्ल्यांची माहिती आहे. याशिवाय, देशाच्या ५२१ जिल्ह्यांमधील ४ हजार ८८ किल्ले तसेच महालांची माहिती आहे.
१ हजार २८२ रंगीत छायाचित्रे आहेत. ३३ नकाशे देण्यात आले आहेत. त्याशिवाय दुर्गभ्रमंती करणाऱ्यांना आवश्यक असलेली किल्ल्यांचे अक्षांश रेखांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, जिल्ह्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर व दिशा अशी सर्व माहितीही या ग्रंथात आवर्जून देण्यात आली आहे.