कोरोना प्रादुर्भावाचा होणार सखोल अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:19+5:302021-04-05T04:09:19+5:30
पुणे: लग्न, पार्ट्या, मोठे समारंभ आणि विनाकारण केली जाणारी गर्दी यामुळे गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ...
पुणे: लग्न, पार्ट्या, मोठे समारंभ आणि विनाकारण केली जाणारी गर्दी यामुळे गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे स्वयंशिस्त आणि कोरोना बाबत खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ शकेल, असे कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रीयल रीसर्चचे (सीएसआयआर) महासंचालक शेखर मांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच कोरोना प्रादुर्भाव कोणत्या कारणांमुळे वाढत चालला आहे,याबाबत अधिक सखोल अभ्यास केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून याबाबत सर्वांनीच काळजी करण्याची गरज आहे,असे स्पष्ट करून मांडे म्हणाले, देशातील एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीचा विचार करता महाराष्ट्रातील रुग्ण अर्ध्यापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे सर्वांनीच याबाबत गंभीर होणे गरजेचे आहे. शासनाकडून विविध पातळ्यांवर कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. परंतु,यात नागरिकांची स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. देशावर आलेल्या संकटाला नेहमीच महाराष्ट्राने दिशा दाखवली आहे. सध्या निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल.
सध्या ''सीएसआयआर''सह काही संशोधन संस्थांच्या माध्यमातून कोरोना संदर्भातील ''जुनोब सिक्वेन्सिंग'' चा अभ्यास केला जात आहे. परंतु, राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे पाच टक्के नमुने एकत्रित करून याबाबत सखोल अभ्यास केला जाणार आहे. शासनाकडून सर्व नमुने योग्य पद्धतीने मिळतील याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली आहे. या अभ्यासासह म्युटेशनचा वाढता वेग व इतर संशोधनात्मक कामासाठी एनसीएल या संस्थेला बरोबर घेणार आहे. तसेच संशोधनात्मक अभ्यासासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण एनसीएलमधील कर्मचारी व शास्त्रज्ञांना दिले जाणार आहे, असेही शेखर मांडे यांनी स्पष्ट केले.