थंडीत आणखी वाढ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:48 AM2024-01-21T00:48:28+5:302024-01-21T00:48:42+5:30
थंडी अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : दक्षिण कर्नाटकापासून पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून, पुणे व परिसरातील किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे थंडीत वाढ होईल.
उत्तरेकडे गेल्या काही दिवसांपासून बर्फ पडत असून, शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने इथेही थंडी पडत आहे. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद जळगावात ११ अंश सेल्सिअस झाली आहे. तर पुण्यामध्ये १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर व मध्य महाराष्ट्रात, कोकणात किमान तापमानात घट होणार आहे. परिणामी थंडी अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
येत्या पाच दिवसांमध्ये पुणे व परिसरातील किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. त्यामुळे थंडी अधिक वाढेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
पुणे शहरातील किमान तापमान
एनडीए : १२.५
शिवाजीनगर : १३.४
पाषाण : १३.९
कोरेगाव पार्क : १७.४
मगरपट्टा : १८.६
वडगावशेरी : १८.८