जिल्हा बँँक निवडणुकीत दिग्गजांचा कस लागणार
By admin | Published: April 10, 2015 05:33 AM2015-04-10T05:33:35+5:302015-04-10T05:33:35+5:30
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. ५ मे रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवार (दि. ९)पासून
कळस : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. ५ मे रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवार (दि. ९)पासून सुरुवात झाली. जिल्ह्याची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या या बँकेच्या निवडणुकीसाठी दिग्गजांचा कस लागणार आहे. यामध्ये तालुका मतदारसंघातून लढती चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.
बँकेची निवडणूक विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेली होती. निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये संचालकांची संख्याही कमी होऊन २१ झाली आहे. तालुका संघातून १३, ब वर्ग १, क वर्ग १, ड वर्ग १, अनुसूचित जाती-जमाती १, ओबीसी १, वि. जाती भटक्या जमाती १ व महिला २, असा समावेश आहे. यामध्ये तालुका मतदारसंघासाठी विविध कार्यकारी संस्थेच्या प्रतिनिधी मतदारांचा समावेश असल्यामुळे तालुका नेत्यांचा यामध्ये कस लागणार आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू असतानाच बँकेचा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सोमवार (दि. १३)पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. (वार्ताहर)