रब्बी ज्वारी, हरभऱ्याच्या क्षेत्रात होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 10:00 PM2019-11-27T22:00:00+5:302019-11-27T22:00:02+5:30
रब्बी ज्वारी, हरभरा आणि मक्याच्या क्षेत्रात यंदा चांगली वाढ होईल
पुणे : ऑक्टोबर महिना अखेरीपर्यंत लांबलेल्या पावसाने विश्रांती दिल्यानंतर रब्बी पेरण्यांच्या कामांना चांगला वेग आला आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार हेक्टर असून, त्या पैकी १५ लाख २० हजार हेक्टरवरील (२६.७० टक्के) पेरण्याच उरकल्या आहेत. रब्बी ज्वारी, हरभरा आणि मक्याच्या क्षेत्रात यंदा चांगली वाढ होईल, असा अंदाज आहे.
जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत यंदा जोरदार पाऊस झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे जालेल्या अतिवृष्टीने पश्चिम महाराष्ट्रासह विविध ठिकाणी दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, भात, मका, तूर, हळद, भुईमूग, नाचणी, संत्रा, डाळिंब, पपई, द्राक्ष आणि ऊस अशा विविध प्रकारच्या पिकांचा समावेश आहे. लांबलेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्यांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर रब्बी पेरण्यांनी वेग घेतला आहे.
रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाक ७८ हजार ५१३ हेक्टर असून, त्या पैकी १० लाख २३ हजार १६३ हेक्टरवरील (३८ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच काळात ६ लाख ७६ हजार ५०५ हेक्टरवरील पेरण्याच होऊ शकल्या होत्या. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर या पुणे विभागात रब्बीचे सर्वाधिक १३ लाख ५ हजार ४०७ हेक्टर क्षेत्र आहे. त्या पैकी ५ लाख ८३ हजार २८७ हेक्टरवरील पेरणीची कामे झालेली आहेत.
गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, त्या पैकी ६४ हजार ३४४ हेक्टरवरील (६ टक्क) पेरणी झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. हरभºयाच्या क्षेत्रात मात्र यंदा वाढ होईल. हरभºयाचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, त्या पैकी ३ लाख ६१ हजार ६९ हेक्टरवर (२४ टक्के) पेरणी झाली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टर असून, पैकी ४५ हजार ८९६ हेक्टरवरील पेरणीची (२० टक्के) कामे झाली आहेत.
-----------
मका, ज्वारीवर रोगाचा प्रादुर्भाव
पुणे, अमरावती, नागपूर विभागात काही ठिकाणी मका व ज्वारी पिकावर लष्करी अळीचा, तर, हरभरा पिकावर हेलीकोवर्पा या किडीचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.