रविवारी अाता खडकवासला चाैपाटीवर नाे पार्किंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:02 PM2018-07-29T17:02:53+5:302018-07-29T17:03:09+5:30
पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे.
पुणे : खडकवासला धरण परिसरातील चौपाटीवर वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दर रविवारी खाद्य पदार्थांचा गाडा आणि पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला असून आज पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ऐतिहासिक सिंहगड किल्ला, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांचा परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसांत वाहतुकीचा फज्जा उडतो. खडकवासला धरण चौपाटीवर अरुंद रस्ता आणि त्यावर केल्या जाणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी हमखास होते. ग्रामीण पोलीस दलाचे तीस ते चाळीस कर्मचारी शनिवार आणि रविवार या परिसरात असतात. परंतु अरूंद रस्त्यामुळे कोंडी नियंत्रणाबाहेर असते. त्यामुळे आजपासून या परिसरात खाद्य पदार्थांचा गाडा आणि पार्किंग साठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविषयी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले की, खडकवासला धरण परिसरातील चौपाटीवर सिंहगड रस्ता अरूंद असून शनिवार आणि रविवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. पार्किंग साठी चौपाटीवर जागा नसल्यामुळे पर्यटक अरूंद रस्त्यावर वाहन पार्किंग करतात. या दिवसात साधारण वीस ते तीस हजार पर्यटकांचा असतो. तसेच धरणाच्या वर असणाऱ्या गावकऱ्यांना येथील वाहतूक कोंडीचा त्रास होतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.