कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:07 PM2024-02-07T14:07:19+5:302024-02-07T14:07:42+5:30
मी स्वतः येत्या १० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार
आळंदी : माझे जीवन समाजासाठी अर्पण केले असून समाजालाच मायबाप मानले आहे. समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही. आगामी काळातही समाजासाठीच लढणार आहे. आरक्षण भेटल्यावर मराठा समाजाचे क्लासवन आधिकारी झालेले पहायचे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचा आहे. त्यामुळे जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत इंचभरही मागे हटणार नसल्याचे मनोज जरांगे - पाटील यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र आळंदीत मनोज जरांगे - पाटील यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी फटाक्याच्या अतिषबाजीत जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान शेलपिंपळगाव, शेलगाव, वडगाव - घेनंद गावांत जरांगे पाटलांचे स्थानिकांनी स्वागत करून सत्कार केला.
जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने मराठ्यांची मुलं मुबंईला गेली. जो मराठा आरक्षणासाठी कायदा लागतो. तो राज्यात सापडला आहे. त्यासाठी अधिवेशनात सगेसोयरे कायदा पारित करायचा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षांतील आमदारांनी हा कायदा मंजूर होण्यासाठी मराठ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. सभा संपल्यानंतर माऊलीं मंदिरात जाऊन त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
मराठा बांधव व ओबीसी बांधव गावोगावी प्रेमाने वागत आहेत. एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र असतात मात्र काही जण उगाचच त्यांच्यामध्ये वाद निर्माण करत आहेत. मंत्री छगन भुजबळांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
प्रत्येक मतदार संघातील आमदारांना फोन करा व पत्र लिहा. येत्या १५ तारखेच्या अधिवेशनात जो सगेसोयरे कायदा आहे पारित होणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एकमताने आवाज उठवा. मी स्वतः येत्या १० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. आपल्याला टिकणारे आरक्षण मिळवायचे आहे. - मनोज जरांगे पाटील.