पाईट व डेहेणे येथे होणार ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:15 AM2021-09-16T04:15:27+5:302021-09-16T04:15:27+5:30

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईट व डेहेणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर ...

There will be a rural hospital and a trauma care center at Pite and Dehene | पाईट व डेहेणे येथे होणार ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर

पाईट व डेहेणे येथे होणार ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर

Next

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईट व डेहेणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना कुटुंबातील व्यक्ती आजारी पडल्यास उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय चांडोली व चाकण या ठिकाणी जावे लागत होते. मात्र, हे अंतर दूर असल्याने वेळेत उपचार नव्हते. खासगी रुग्णालयातील महागडी आरोग्य सेवा रुग्णांना परवडणारी नव्हती. खेडच्या पश्चिम भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर उभारल्यास नागरिकांना मोफत चांगल्या दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा अगदी जवळच्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात तसेच कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता भविष्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये होणे गरजेचे होते.

खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी पालकमंत्री अजित पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद, जिल्हा अधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पुणे जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये रूपांतर करून मंजुरी द्या, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला होता.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ असणाऱ्या पाईट व डेहेणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये होण्यास मंजुरी मिळाल्याने पाईट व डेहेणे तसेच पश्चिम भागातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, अध्यक्षा निर्मला पानसरे यांचे आभार मानले आहेत.

चौकट.........

खेडमधील पाईट व डेहेणे, भोरमधील नसरापूर, मुळशीतील पिरंगुट, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे ग्रामीण रुग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. अखेर या प्रस्तावास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मान्यता देऊन कामाच्या कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

Web Title: There will be a rural hospital and a trauma care center at Pite and Dehene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.