कात्रज चौकात ध्वनीरोधक सहापदरी उड्डाणपूल होणार : नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 07:27 PM2019-11-15T19:27:40+5:302019-11-15T19:28:15+5:30
१३५ कोटी रुपयांना लवकरच मान्यता
पुणे : कात्रज चौकामधे सहापदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, त्यासाठी १३५ कोटी रुपयांच्या निधीस लवकरच मान्यता देण्यात येईल. उड्डाण पुलावरील वाहतुकीमुळे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांना त्रास होऊ नये ,यासाठी पुलावर ध्वनीरोधक (साऊंड बॅरीयर) यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे केली.
वडगाव (नवले पूल) ते कात्रज दरम्यानच्या ३.८८ किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याच्या कामांचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. आंबेगाव येथील शिवसृष्टी येथे हा कार्यक्रम झाला. आमदार शिवेंद्रराजे भोसले, भीमराव तापकीर, माजी आमदार योगेश टिळेकर, श्रीनाथ भीमाले, बाबा मिसाळ, जगदीश कदम, मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमापुर्वी गडकरी यांनी शिवसृष्टीच्या कामाची माहिती घेतली. तसेच, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवसृष्टीचे स्वप्न सर्वांनी मिळून साकार करण्याचेही त्यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, पुणे-सातारा रस्त्यावरील काम अडचणीचे ठरत आहे. त्यात ठेकेदार, नागरीक असा सर्वांचाच त्रास होत आहे. जवळपास नव्वद टक्के काम झाले आहे. उर्वरीत काम लवकरच मार्गी लागेल. वडगाव ते कात्रज दरम्यान उभारण्यात येणाºया सहापदरी रस्त्यांना आवश्यक पूरक रस्ते निर्माण करण्यात येतील. तसेच, शिवसृष्टीकडे येणे पर्यटकांना सोयीचे जावे यासाठी देखील विशेष प्रयत्न करण्यात येतील. या शिवाय कात्रज चौकात सहापदरी उड्डाणपूल बांधण्यात येईल. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये याची दक्षता घेतली जाईल. त्यानुसार उड्डाण पुलावर ध्वनीरोधक बसविण्यात येईल.
तत्पूर्वी झालेल्या भाषणात आमदार तापकीर यांनी सेवा रस्त्यांची रुंदी सात वरुन दहा मीटर करण्याची मागणी केली. गडकरी यांनी ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन आपल्या भाषणात दिले.
--------------