राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होणार; जिल्ह्याचा उपक्रम पथदर्शी ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:27+5:302021-02-24T12:14:03+5:30
निनाद देशमुख - पुणे : जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य ...
निनाद देशमुख -
पुणे : जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्याशिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण मोहीम राबिवण्यात आली होती. त्यांना पुन्हा शिक्षण देण्यासाठी या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे समुुपदेशन करण्यात येणार होते. जिल्हा परिषदेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता राज्याच्या शिक्षण विभागाने स्वीकारला असून संपूर्ण राज्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्याने जिल्ह्याचा उप्रकम पथदर्शी ठरणार आहे.
जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांची मुले, तसेच दुकानांवर अल्पवयीन मुले काम करत असतात. त्यांना त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्या हक्काची पायमल्ली होत होती. अशा मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची माेहीम मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली. त्यानुसार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांमार्फत हे सर्वेक्षण राबविण्यात आले. छोटे उद्योग, वीटभट्ट्या, कारखाने या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले. तालुक्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यावर होती. या साठी केंद्रप्रमुखांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले होते. ही सर्व माहिती गुगल फॉर्मद्वारे ऑनलाइन भरण्यात आली. आढळलेल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सध्या पालकांचे आणि मुलांचे समुपदेशन करण्याचे काम सुरू आहे.
हा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबिवण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागातर्फे आदेश दिले आहे. १ ते १० मार्चपासून ही मोहीम राज्यात राबविली जाणार आहे. यात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना कामगार विभाग आदी विभागातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे.
........................
कोरोना काळात अनेक कुटुंबांचे स्थलांर झाले आहे. यातील ६ ते १८ वयोगटातील अनेक मुले शाळाबाह्य झाल्याने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम राज्यात लागू केली जाणार आहे. ग्रामपंचयात, नगरपरिषद विभागातील सर्व हॉटेल, वीटभट्ट्या, गुऱ्हाळे आदी ठिकाणी हे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षक आदीच्या मदतीने हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
,.....................
जिल्हा परिषदेने कोरोना काळात राबविलेल्या अनेक योजना राज्याने स्वीकारल्या आहेत. शाळाबाह्य मुलांच्या संदर्भात सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये ओसरीवर शाळा शिकवण्यासाठी सर्वेक्षण केले होते. ग्रामविकास मंत्रालयाला व राज्याच्या शिक्षण विभागाला त्याची माहिती दिली होती. याचे स्वागत दोन्ही खात्यांनी केली होती. अनेक योजना आम्ही प्रभावीपणे राबवत आहोत. शालाबाह्य सर्वेक्षणाबाबतही चांगली कामगीरी जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे जे जे प्रकल्प पुणे जिल्हा परिषदेने राबिवले आहे. ते राज्य सरकार पूर्ण राज्यात राबवत असल्याने समाधान वाटत आहे.
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद