पुण्यात हेल्मेटसक्ती विराेधात हाेणार घंटानाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 02:20 PM2019-01-31T14:20:46+5:302019-01-31T14:28:07+5:30
हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेट सक्तीविराेधी कृती समिती 1 फेब्रुवारी राेजी मंडईतील टिळक पुतळा येथे घंटानात आंदाेलन करणार आहे.
पुणे : नवीन वर्ष सुरु हाेताच पुणेकरांना हेल्मेटसक्तीला सामाेरे जावं लागलं. एक जानेवारीपासून शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. दरराेज पाेलीस पाच ते सहा हजार नागरिकांकडून हेल्मेट न घातल्याबद्दल दंड वसूल करत आहेत. या हेल्मेटसक्तीला अनेक स्तरातून विराेध केला जात आहे. त्यामुळे हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेटसक्तीविराेधी कृती समिती 1 फेब्रुवारी राेजी मंडईतील टिळक पुतळा येथे घंटानात आंदाेलन करणार आहे. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदे मध्ये याविषयी माहिती देण्यात अली.यावेळी बाळासाहेब रुणवाल, मंदार जोशी, धनंजय जाधव, संदीप खर्डेकर, शिवा मंत्री आदी उपस्थित होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार शहरात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. दिवसाला सरासरी पाच हजार केसेस करण्यात येत आहेत. दरम्यान, हेल्मेटचा वापर असावा परंतु त्याची सक्ती असू नये या मागणीसाठी कृती समितीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीविरोधात गेल्या महिन्यात सविनय कायदेभंग रॅली करत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तरीदेखील कारवाई सुरूच असल्याने आता याविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान हेल्मेटच्या दर्जाबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यत येत आहे. शहरात विकली जाणारी हेल्मेटस भारतीय मानक ब्युरोच्या नियमाप्रमाणे आहेत का? याची तपासणी व्हावी. तसेच, सदर हेल्मेटची गुणवत्ता तपासणीची यंत्रणा देशात दोनच ठिकाणी आहे. यामुळे शहरात विकली जाणारी हेल्मेट आयएसआय मानांकनानूसार योग्य असल्याची खात्री पोलीस देणार का? असा सवाल यावेळी कृती समितीकडून उपस्थित करण्यात आला आहे.