...त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पाडणे अशक्य; रोहित पवारांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:27 PM2022-10-23T12:27:44+5:302022-10-23T12:27:52+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात दुसरा मोठा पक्ष
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात दुसरा मोठा पक्ष आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून काम करतो, त्यामुळे या पक्षात फूट पाडणे शक्य नाही. आमचा पक्ष अभेद्य आहे आणि अभेद्यच राहील, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
बारामती येथे माध्यमांशी बोलताना पवार यांनी पक्ष अभेद्य असल्याचे सांगितले. शिवसेना हा मोठा पक्ष होता, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर दबाव आणून व वेगवेगळ्या प्रकारे राजकारण करून तो पक्ष फोडला गेला. त्याच्यामागे कोण होते हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अशा पद्धतीने जेव्हा मोठा पक्ष फुटतो, तेव्हा उद्धव ठाकरे ताकद लावून निष्ठावंत कार्यकर्ते घेऊन पक्ष पुन्हा उभा करतील. मात्र, तो पक्ष फुटला. फोडाफोडीच्या राजकारणात काहींना यश मिळाल्याचे वाटत असेल. कदाचित त्यांचे दुसरे लक्ष्य राष्ट्रवादी असल्याचे सांगितले जात आहे. कारण दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे; पण राष्ट्रवादी फोडणे शक्य नाही, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही कुटुंब म्हणून काम करीत असल्याने हे शक्य नाही. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकार नक्कीच याबाबत सकारात्मक विचार करील, अशी अपेक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या हंगामात ऊस उभा राहिला. उन्हाळ्यात ऊस कामगारांना ऊस तोडावा लागला. विरोधक हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नसल्याची टीका पवार यांनी केली.
माझ्या विरोधकांना विरोध करणे माहीत आहे, विकासकामे करणे माहीत नाही. जनतेने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, असेही रोहित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असती तर मान्य केले असते; पण केवळ विरोधकांवर कारवाई व्हावी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असेही पवार म्हणाले.