...म्हणून स. प. महाविद्यालयात 'डेज' साजरे करण्यास घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 07:46 PM2020-01-17T19:46:39+5:302020-01-17T19:54:19+5:30
स.प. महाविद्यालायात विविध डे. ज साजरे करण्यावर महाविद्यालयाने बंदी घातली आहे.
पुणे : सर परशुराम महाविद्यालयामध्ये ( स. प. महाविद्यालय) प्रशासनाकडून नाेटीसीद्वारे विद्यार्थ्यांना व्हॅलेंटाईन डे, चाॅकलेट डे असे विविध डेज साजरे करण्यास बंदी घातली आहे. महाविद्यालयाच्या बाहेरील घटकांकडून या डेजचे आयाेजन करण्यात आले हाेते. तसेच महाविद्यालयात इतर अनेक फेस्ट सुरु असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने असा निर्णय घेतला असल्याते स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी स्पष्ट केले.
जानेवारी महिन्यात महाविद्यालयांमध्ये विविध डेज साजरे केले जातात. यात राेज डे , चाॅकलेट डे, व्हॅलेंटाईन डे अशा डेजचा समावेश असताे. या डेजला अनेकदा महाविद्यालयांची परवानगी नसते. विद्यार्थ्यांकडून आपआपल्या ग्रुप्समध्ये असे डेज साजरे केले जातात. यंदा स. प. महाविद्यालयाने नाेटीस काढत हे डेज साजरे न करण्याची सुचना विद्यार्थ्यांना केली आहे. तसेच असे डेज महाविद्यालयाच्या आवारात साजरे झाल्यास कारवाई करणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. महाविद्यालयात या डेजच्या व्यतिरिक्त माैजमजा करण्याची दुसरी संधी नसते असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. लाेकमतशी बाेलताना प्राचार्य दिलीप शेठ म्हणाले, विविध डेज साजरे करण्याबाबत लावण्यात आलेले पाेस्टर हे महाविद्यालयाच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांमार्फत लावण्यात आले हाेते. सध्या काॅलेजमध्ये विविध विभागांचे फेस्ट सुरु आहेत. त्याचबराेबर असे डेज महाविद्यालयात साजरे करु न देण्याबाबत अनेक पालकांचे देखील फाेन आले हाेते. अशा डेजच्या माध्यमातून अनेकदा महाविद्यालयाच्या आवारात गंभीर प्रकार देखील घडत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे फेस्ट न साजरे करण्याबाबत नाेटीस लावण्यात आली आहे.