...म्हणून झाडांचे दस्तऐवजीकरण व्हावे..!
By श्रीकिशन काळे | Updated: January 21, 2025 19:21 IST2025-01-21T19:20:34+5:302025-01-21T19:21:51+5:30
२०१० मध्ये पहिले पुस्तक आले. त्यानंतर हे पुस्तक आऊट ऑफ प्रिंट झाले.

...म्हणून झाडांचे दस्तऐवजीकरण व्हावे..!
पुणे : ‘‘शहरातील झाडांची माहिती संकलित करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण दुर्मिळ झाडं नष्ट झाली की, पुन्हा ते दिसत नाहीत. ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. वा. द. वर्तक यांनी मला विमानतळ रस्त्यावरील एक पळसाचे झाड सांगितले होते. त्याला सोनेरी फुलं यायची. हे एकमेव असे झाड होतं. पण नंतर रस्ता रुंदीकरणात हे झाड नष्ट झाले. मी पाहायला गेलो तर ते दिसले नाही, म्हणून झाडांचे दस्तऐवजीकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. श्रीकांत इंगळहळीकर यांनी व्यक्त केली.
करोला पब्लिकेशन, पुणेतर्फे प्रकाशित ‘न्यू ट्रीज ऑफ पुणे’ या फिल्ड गाइडचे प्रकाशन मंगळवारी (दि. २१) एम्प्रेस गार्डनमध्ये करण्यात आले. याप्रसंगी एम्प्रेस गार्डनच्या उपाध्यक्ष सुमनताई किर्लोस्कर, मानद सचिव सुरेश पिंगळे, सहलेखिका शर्वरी भावे आदी उपस्थित होते.
इंगळहळीकर म्हणाले, या पुस्तकात ५०० प्रजातीची झाडे आहेत. काही दुर्मिळ देखील आहेत. २०१० मध्ये पहिले पुस्तक आले. त्यानंतर हे पुस्तक आऊट ऑफ प्रिंट झाले. मग पुन्हा प्रिंट करायला पाहिजे. गेल्या १५ वर्षांमध्ये काय घडले ते यात आहेत. पुस्तकात देशी व विदेशी झाडांची माहिती आहे. पुण्यात ५५ टक्के विदेशी जाती आहेत. एवढ्या जाती इतर शहरात नाहीत.’’
‘‘मोठमोठ्या कंपन्या पुण्याभोवती आहेत. त्यांच्या कॅम्पसमध्ये आपण अनेक दुर्मिळ झाडं लावू शकतो. त्या कंपन्या ती झाडं वाढवू शकतील, असे पिंगळे यांनी सांगितले.
शर्वरी भावे म्हणाल्या, या पुस्तकाचा उपयोग विद्यार्थी, बॉटनिस्ट यांना होऊ शकतो. ज्यांना संशोधन करायचे असेल, ते देखील याचा उपयोग होईल. या पुस्तकामुळे झाड ओळखू शकाल.’’
आणखी एक पुस्तक होईल..!
सध्या या पुस्तकात ५०० जातीची झाडं आहेत. तर आणखी ४०० जातीची झाडं आहेत. त्यांचा यात समावेश केला नाही. त्यांचे वेगळे पुस्तक करणार आहे. त्याची तयारी आतापासून सुरू केली आहे, असे इंगळहळीकर म्हणाले.
ई-बुक देखील येणार
या पुस्तकाचे ई-बुक येणार आहे. त्यात झाडाचे पान असेल, त्यावर क्लिक केले की, प्रत्यक्षात त्या झाडापर्यंत जाता येऊ शकेल. जिओ टॅगिंग केलेले आहे.
नांदेड सिटीमध्ये ज्या पुण्यात नाहीत, अशा १२० जाती लावायला दिल्या आहेत. तिथे त्या छान नांदत आहेत. तसेच आयसर संस्थेमध्येसुद्धा अनेक दुर्मिळ जाती आहेत. सिंहगडच्या पायथ्याला माझ्या स्वत:च्या जागेत काही जाती लावलेल्या आहेत. - श्रीकांत इंगळहळीकर, ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ
घरातील अंगण गेलेले आहेत. त्यामुळे मुलांना आता झाडं कुठं पाहायला मिळतील, तर मोठ्या बागांमध्येच! एम्प्रेस गार्डन त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. - सुमनताई किर्लोस्कर, उपाध्यक्ष, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन