ही आहेत पुणेकरांची खरेदीसाठीची सर्वाधिक पसंतीची ठिकाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 09:06 AM2018-10-28T09:06:01+5:302018-10-28T09:06:01+5:30
पुण्यासारख्या ठिकाणी तर आधुनिकता आणि परंपरेचा संगम असलेल्या वस्तू बघायला मिळतात.
पुणे : खरेदी म्हटली की, सर्वानाच त्याचा मोह आवारत नाही. त्यातही पुण्यासारख्या ठिकाणी तर आधुनिकता आणि परंपरेचा संगम असलेल्या वस्तू बघायला मिळतात. त्यामुळे खरेदीसाठी पुणेकरांचे काही खास शॉपिंग स्पॉट आहेत. फक्त सणांच्या काळात नाही तर इतरवेळीही ही ठिकाणं गर्दीने ओसंडून वाहत असतात. चला, जाणू या ही ठिकाणं !
जुना बाजार : खरेदी ही कायम कपडे आणि दागिन्यांची नसते. अनेकदा बाजारातून हद्दपार झालेल्या एखाद्या वस्तूचा एखादा पार्ट हवा असेल तर जुन्या बाजाराला पर्याय नाही. शहरातील मंगळवार पेठ भागात जुना बाजार भरतो.बुधवार आणि शनिवारी भरणाऱ्या या बाजारात अँटिक वस्तूही मिळतात.
तुळशीबाग :महिलांच्या वापरात असलेली अशी एकही गोष्ट नाही जी तुळशीबागेत मिळत नाही. कपडे, चप्पल, पर्स, कानातले, गळ्यातले सेट अशा शेकडो वस्तू परवडणाऱ्या दरात आणि फॅशनमध्ये असताना मिळणारे ठिकाण अर्थात तुळशीबाग. बाजीराव रस्त्यावर वसलेल्या तुळशीबागेने पुण्यातील प्रत्येक महिलेचे मन जिंकले आहे.
फर्ग्युसन कॉलेज रोड : तुळशीबागेपेक्षा किंचित महाग आणि जरासे आधुनिक कपडे मिळण्याचे ठिकाण अर्थात फर्ग्युसन रस्ता. तुम्हाला तर रस्त्यावर घासाघीस करून खरेदी करायला आवडत असेल तर हा पर्याय उत्तम आहे. वनपीस, टॉप्स, जीन्स आणि वेगवेगळ्या चपला घेण्यासाठी तरुणींची पावले हमखास फर्ग्युसन रस्त्याकडे वळतात.
एम जी रोड : कॅम्प एरियात असणाऱ्या एम जी रस्त्यावर अनेक दुकाने आहेत. मुळात हा परिसर शहरापासून काहीसा दूर आहे. पण शहरात येणारी प्रत्येक फॅशन पहिल्यांदा इथे येते असं म्हटलं जातं.त्यामुळे तुम्ही फॅशनिस्टा असाल तर इथे जायलाच हवे.
हाँग-काँग लेन :डेक्कनजवळ असणाऱ्या या लहानशा बोळीत कपडे सोडून बाकी सर्व वेस्टर्न ऍक्सेसरीज मिळण्याचे ठिकाण अर्थ हाँग-काँग लेन. इथे पाकिटे, पर्स, अत्तरे, कानातले टॉप्स, बेल्ट अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. इथेही भाव करण्याची संधी असते. इथे तरुण-तरुणींची कायम गर्दी असते.