पुण्यात पांढऱ्या साळुंकीचे दर्शन; अल्बिनो नावाने ओळखतात हे पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 06:32 PM2021-10-13T18:32:36+5:302021-10-13T18:32:47+5:30
पुण्यात पांढऱ्या साळुंकीचे नुकतेच दर्शन झाले. अशा प्रकारची साळुंकी दुर्मिळ समजली जाते. त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे मत पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
श्रीकिशन काळे
पुणे : आपण काळी, तपकिरी रंगाची साळुंकी पाहतो. पण पुण्यात पांढऱ्या साळुंकीचे नुकतेच दर्शन झाले. अशा प्रकारची साळुंकी दुर्मिळ समजली जाते. त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे मत पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या प्रकाराला ल्युसिस्टिक (leucistic) अल्बिनिझम असे म्हटले जाते. माणसांना होणारा कोड आपल्याला माहित आहे. पण प्राणी, पक्ष्यांमध्येही हा कोड दिसून येतो.
शंकरशेठ रस्ता, गुरूनानक नगरमध्ये राहणारे निसर्गप्रेमी विश्वास घावटे यांच्या गार्डनमध्ये या पांढऱ्या सांळुकीचे दर्शन झाले. त्यांनी त्याचे फोटो काढले असून, त्यांनी असा पक्षी पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगितले. या विषयी पक्षीतज्ज्ञांना विचारले असता, त्यांनी हा त्वचाविकार असल्याचे सांगितले. शरीरात मेलॅनिन द्रव्य निर्माण होण्यासाठी एंजाइम लागतात. परंतु, त्या एंजाइमच्या कमतरतेमुळे त्वचा पांढरी होते. हा एक त्वचारोगाचा प्रकार असून, माणसांमध्ये जसा कोड असतो, तसाच प्राणी, पक्ष्यांमध्येही असतो. त्याला अल्बिनो असे नाव आहे. यामध्ये सर्वच पक्ष्यांचा समावेश आहे.
पांढऱ्या रंगाचे प्राणी वेगळी प्रजाती नव्हे...
नुकताच राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील पांढरा वाघ हा मृत्यूमुखी पडला होता. प्राणिसंग्रहालयात अजून एक पांढरा वाघ आहे. खरंतर पांढरे पक्षी, प्राणी ही वेगळी प्रजाती नाही, तर त्यांच्या शरीरात काही द्रव्यांची कमतरता निर्माण झाल्यास असा रंग येतो. परंतु, तो रंग नागरिकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
रंगद्रव्य कमी झाल्याने येतो पांढरा रंग
शरीरातील रंगद्रव्य कमी झाली की, पांढरा रंग किंवा एखादा रंग कमी - जास्त होतो आणि मग ते प्राणी, पक्षी वेगळ्या रंगाचे दिसतात. सांळुकीमध्येही असाच प्रकार झाला आहे. याला पार्शियल अल्बिनिझम असे म्हणतात. साळुंकीच्या डोक्याकडील भागात रंगद्रव्य कमी झाल्याने ती अर्धी पांढरी दिसते. माणसांमध्ये जसा कोड असतो, तसाच हा प्राणी, पक्ष्यांमध्ये असतो. हे पक्षी वेगळे दिसतात म्हणून इतर पक्षी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. यांना कधी कधी डोळ्यांना कमी दिसते. मग अशा पक्ष्यांची शिकार होते. कारण ते सहज जाळ्यात सापडतात. मी काळा घुबड पाहिलाय, लाल रंगाची कोकिळ पाहिलीय. अनेक पक्ष्यांमध्ये हे अल्बिनिझम होतं असे पक्षीतज्ज्ञ डाॅ. सतीश पांडे यांनी सांगितले.