Sharad Pawar: "आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी", जैन मुनींच्या प्रश्नाला शरद पवारांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:40 AM2024-06-12T10:40:53+5:302024-06-12T10:41:05+5:30
दगडूशेठ गणपतीला आले असताना पवारांनी मासाहार केल्यामुळे ते मंदिरात गेले नसल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते
किरण शिंदे
पुणे : मी याआधी शाकाहारी नव्हतो, मात्र मागील वर्षभरापासून मी पूर्णतः शाकाहारी आहे असं सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar). बारामतीत जैन मुनींच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. मध्य प्रदेशातून बारामती येथे काही जैन मुनि आले आहेत. मंगळवारी या जैन मुनिंचे शरद पवारांनी दर्शन घेत त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी एका जैन मुनींनी शरद पवारांना उद्देशून शाकाहार बद्दल तुमचे मत काय असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी आहे. या आधी मी शाकाहारी नव्हतो, परंतु मागच्या वर्षभरापासून मी पूर्णतः शाकाहारी आहे.
काही वर्षांपूर्वी शरद पवार श्रीमंत दगडूशेठ (Dagdusheth Temple) गणपतीच्या दर्शनासाठी मंदिरात येणार असल्याचे कळले होते. त्यानंतर शरद पवार श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार याचे सर्वांना कुतुहल होते. शरद पवारांनी एकदाही दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलेले नाही. या नवीन मंदिराची स्थापना झाल्यापासून पवार एकदाही मंदिरात दर्शनासाठी आल्याचेही कुणी पाहिलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या या गणेश दर्शनाची चर्चा शहरात रंगली होती. त्यानंतर शरद पवार दुपारच्या सुमारास मंदिराकडे आले पण, त्यांनी मंदिरासमोर उभे राहून लांबूनच बाप्पाचे मुखदर्शन घेणे पसंत केले. यानंतर मात्र टीका होऊ लागल्याने राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देताना पवारांनी मासाहार केल्यामुळे ते मंदिरात गेले नसल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा या संपूर्ण प्रकाराची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.