मनोहर पर्रिकरांच्या या पाच आठवणी दाखवतात त्यांचा मोठेपणा !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:21 PM2019-03-18T18:21:01+5:302019-03-18T18:24:17+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यावर गोव्यासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पर्रिकर यांच्या साधेपणाच्या, सुसंस्कृतपणाच्या आणि अर्थात माणूस म्हणून असलेल्या संवेदनशील वागणुकीच्या आठवणी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत.
पुणे : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यावर गोव्यासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पर्रिकर यांच्या साधेपणाच्या, सुसंस्कृतपणाच्या आणि अर्थात माणूस म्हणून असलेल्या संवेदनशील वागणुकीच्या आठवणी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. पर्रीकरांचे सुहृद व संघाचे तत्कालीन प्रचारक अजिंक्य कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार विनय चाटी यांच्या बोलण्यातून जागवलेल्या काही स्मृती खास लोकमतच्या वाचकांसाठी.
मुख्यमंत्री कक्षाच्या शेजारी मुलाच्या अभ्यासाची खोली :
पर्रिकर यांच्या पत्नी मेधा यांचे खूप लवकर कर्करोगाने निधन झाले. त्यांची आठवण आणि त्यामुळे आलेले एकप्रकारचे रितेपण त्यांनी आपल्या काहीवेळा मांडले होते. पत्नीच्या निधनानंतर काही महिन्यात त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण वडील म्हणून दोनही मुलांची जबाबदारी त्यांनी कधीच नाकारली नाही. उलट वेळप्रसंगी मुलांच्या आईची भूमिकाही त्यांनी निभावली आणि तीसुद्धा कोणताही आविर्भाव न आणता. पत्नी नसल्यामुळे मुलांचे अभ्यासात नुकसान होऊ नये म्ह्णून मुख्यमंत्री कक्षाच्या शेजारच्या खोलीत मुलांचा अभ्यास घेण्यासही ते विसरले नाहीत. राज्याच्या जबाबदारीसोबत घरची जबाबदारी निभावण्याची भानही त्यांनी राखले.
संरक्षणमंत्री झाल्यावर स्वभावाला मुरड :
पर्रिकर यांचा स्वभाव अतिशय चटकन उत्तर देण्याचा होता. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर किंवा प्रतिक्रिया ते काही क्षणात देत. मुख्य म्हणजे दिलेल्या प्रतिक्रियेवर ते ठाम असत. मात्र दिवसेंदिवस वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी आपल्या स्वभावाला मुरड घालत मोठा संयम अंगी बाणवला. मात्र एखाद्याचे काम होणार नसेल तर त्याला ते स्पष्टपणे नकार द्यायलाही त्यांनी कधी मागेपुढे बघितले नाही.
गोवेकरांचे लाडके मनोहर :
मित्रांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या पर्रिकर यांना मनोहर म्ह्णूनच हाक मारली जाई. गोव्यातली कोणतीही व्यक्ती त्यांना नावाने हाक मारण्याएवढी आपली समजत होती. त्यांनी निर्माण केलेली ही आपुलकी कोणालाही सहज साधता येत नाही. अनेकदा स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे ते वरून अतिशय धारदार, तुटक वाटत असले मनाने अतिशय संवेदनशील होते. प्रत्येक कार्यकर्त्यासह त्यांच्या घरच्यांची माहितीही ते जाणून असत. कधीही भेटल्यावर प्रत्येकाच्या घरच्या व्यक्तीची ते आठवणीने विचारपूस करत असत. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी असंख्य माणसे जोडली.
पुण्याची मस्तानी,मिसळ, मसाला पान आवडीचे :
पर्रिकर खाण्याचे मोठे चाहते होते. विशेषतः पुण्यात आल्यावर ते आवर्जून मिसळ, मस्तानी आणि मसाला पान खायचे. अगदी आमदार असल्यापासून ते संरक्षण मंत्री झाल्यावरही पुण्यातली ही खवैय्येगिरी करायला ते विसरायचे नाहीत.
पर्रिकर यांच्या हाताखाली दोन शिफ्टमध्ये कर्मचारी :
पर्रिकर यांना दररोज १८ तास काम करण्याची सवय होती. संरक्षणमंत्री झाल्यावर तर सुरुवातीच्या दोन महिन्यात त्यांनी संरक्षण विभागातली सर्व कागदपत्रे वाचून काढली होती. त्यामुळे त्यांच्याकडे दोन नव्हे तर चार ओएसडी अर्थात (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) असायचे. त्यामुळे पर्रिकर काम अखंड काम करत असताना अधिकारी मात्र दोन शिफ्टमध्ये काम करायचे.