या नेत्यांना आवरा हो.....: दशक्रिया विधीत ‘श्रद्धांजली’च्या नावाखाली ‘भाषणांचा थाट’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 01:04 AM2019-02-22T01:04:57+5:302019-02-22T01:05:26+5:30
दशक्रियेच्या विधीसाठी आलेल्या पुढारी, नेते यांच्या भाषणांमुळे उपस्थित असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेचे भान आणि वेळेची मर्यादा ओळखण्याची गरज
खोडद : आपल्या संस्कृतीमध्ये दशक्रिया विधी हा तसा संस्काररूपी पुण्यकर्माचा विधी मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी दशक्रिया विधीत प्रवचन आणि काकस्पर्श झाल्यानंतर पाहायला मिळते ती श्रद्धांजलीच्या नावाखाली भाषणाची मांदियाळी..! खरं तरं मयत व्यक्तीच्या मागे त्याने केलेल्या कार्याचा उल्लेख होणे, समाजात त्यांच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा, त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती समाजाला मिळावी, म्हणून त्या व्यक्तीविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती देणे अपेक्षित असते. परंतु, काही मंडळींना यावेळीही परिस्थितीचे भान राहत नाही आणि त्यांची ही भाषणरूपी श्रद्धांजली या दु:खद प्रसंगात हास्यास्पद विषय ठरत आहे. सध्या हे चित्र ग्रामीण भागात सर्रासपणे पाहायला मिळत आहे.
दशक्रियेच्या विधीसाठी आलेल्या पुढारी, नेते यांच्या भाषणांमुळे उपस्थित असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिंडाला काकस्पर्श झाल्यानंतर प्रवचनकार महाराज देखील आपलं प्रवचन आटोपतं घेतात. पण श्रद्धांजलीच्या नावाखाली भाषण लांबलचक करणाऱ्यांची रीघ कमी होत नाही. एकंदरीत ग्रामीण भागात श्रद्धांजलीऐवजी भाषणांची मांदियाळी पाहावयास मिळत आहे. कारण, श्रद्धांजली म्हणजे नेमकी किती शब्दांत मांडायची, हेच अनेकांच्या लक्षात येताना दिसत नाही. एकंदरीत दशक्रियेत श्रद्धांजली व्यक्त करणे म्हणजे हा प्रतिष्ठेचा भाग मानला जाऊ लागला आहे. मात्र, दशक्रियेसाठी लांबवरून आलेले नागरिक व शोकाकुल पाहुण्यांना मात्र ही भाषणं संपायची वाट पाहात ताटकळत बसावे लागत आहे. प्रवचन संपल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पुढारी व नेते अशा प्रकारे भली मोठी यादीच तयार केली जाते. याचवेळी अन्य काही पुढाºयांचे व विविध संस्थांचे शोकसंदेश यावेळी वाचून दाखवले जातात. खरं तर मृत व्यक्तीविषयी अवघ्या २ मिनिटांत बोलून श्रद्धांजली अर्पण करावी, अशी अपेक्षा असते.
या सगळ्या गोंधळात काकस्पर्श झाला आहे, याचा विसर भाषणं करणाºयांना पडतो आणि कार्यक्रम आटोपता घेतला पाहिजे याचे भानदेखील ते हरपून जातात. एवढं सगळं होऊनही जर का एखाद्याला बोलण्याची संधी नाही मिळाली तर पुन्हा त्याची नाराजी, एवढ्यांची भाषणं झालीच होती मग एका भाषणाने काय फरक पडला असता? असा सूर त्या संबंधित पुढाºयांच्या कार्यकर्त्यांकडून निघतो.
वेळेचं भान किंवा वेळेची मर्यादा ओळखून गावच्यावतीने स्थानिक कोणा एकाला श्रद्धांजली वाहण्याची संधी द्यावी. बाहेरून आलेल्या पाहुण्यांच्या वतीने एकाला, सामाजिक क्षेत्रातील एकाला आणि राजकीय क्षेत्रातील एकाला श्रद्धांजली वाहण्याची संधी द्यावी म्हणजे हा कार्यक्रम वेळेत होईल, असे अयशस्वी सल्ले खाली बसलेले नागरिक आपापसांत एकमेकांना देताना पाहायला
मिळत आहे.
श्रद्धांजली म्हणजे भाषण करण्यासाठी मिळालेली संधीच आहे की काय असाच काहींचा गैरसमज झालेला पाहावयास मिळतो आणि लांबलचक व रटाळ भाषणं केली जातात. दशक्रियेच्या निमित्ताने आलेल्या सर्व उपस्थित नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसेच विविध आजारांविषयी प्रबोधन व्हावे, म्हणून एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन असावे, पर्यावरण, निसर्ग, प्लॅस्टिकबंदी, व्यसनमुक्ती, आदी विषयांवर प्रबोधन होऊन जनजागृती करता येईल, अशा व्याख्यानांचे आयोजन या दशक्रियेच्या विधीत करता येईल. समाजप्रबोधन होईल आणि त्यातून समाजाचं काही तरी हित साधले जाईल, असे उपक्रम राबवावेत अशी चर्चा सध्या सूर धरू
लागली आहे.