शिक्षणात रोवतोय त्यांचाही ‘पाय’ : राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 06:52 PM2018-10-03T18:52:46+5:302018-10-03T18:59:32+5:30

सेरेब्रल पाल्सी हा मेंदुशी संबंधित विकार आहे. मेंदुला आघात झाल्यामुळे आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, वाचा, हात, पायांच्या हालचाली यांसह अन्य बाबींवर परिणाम होतो...

They also have 'feet' in education: National Cerebral Palsy Day | शिक्षणात रोवतोय त्यांचाही ‘पाय’ : राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन

शिक्षणात रोवतोय त्यांचाही ‘पाय’ : राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन

googlenewsNext
ठळक मुद्देहा विकार पुर्णपणे बरा होत नसला तरी त्यात सुधारणा होऊ शकते.स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा संघटनेतर्फे दरवर्षी एक संकल्पना घेऊन त्याविषयी जनजागृती विशेष शाळा निर्माण झाल्यास त्यांच्या पंखांना आणखी बळ

राजानंद मोरे
पुणे : सेरेब्रल पाल्सी या विकारामुळे स्नायूंच्या हालचालीवर मर्यादा आल्याने अनेक मुलांना इतरांप्रमाणे खेळता-बागडा येत नाही. मग त्यांच्याप्रमाणे शिक्षण मिळणे तर लांबच. भलेही समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो, पण त्यातील अनेक मुलं शिक्षणाच्या वाटेवर चालु लागली आहेत. अनंत अडचणींवर मात करत पुढे जात आहेत. मागील दोन वर्षातील इयत्ता दहावी-बारावीच्या निकालावरून याची जाणीव होते. पण अजूनही चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्यास, विशेष शाळा निर्माण झाल्यास त्यांच्या पंखांना आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञ करीत आहेत.
‘इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ सेरेब्रल पाल्सी’ या संघटनेतर्फे २०१० या वर्षापासून दि. ३ आॅक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन’ म्हणून साजरा केला जातो. संघटनेतर्फे दरवर्षी एक संकल्पना घेऊन त्याविषयी जनजागृती केली जाते. यावर्षी ‘एनेबल डु नॉट लेबल’ ही संकल्पना घेण्यात आली आहे. सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांमधील सकारात्मक बाजू, चांगल्या बाबी लक्षात घेऊन त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे हा त्यामागचा उद्देश आहे. सेरेब्रल पाल्सी हा मेंदुशी संबंधित विकार आहे. या विकारामुळे स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. मेंदुला आघात झाल्यामुळे आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, वाचा, हात, पायांच्या हालचाली यांसह अन्य बाबींवर परिणाम होतो. हा विकार पुर्णपणे बरा होत नसला तरी त्यात सुधारणा होऊ शकते. याबाबत मागील काही वर्षात पालकांमध्ये जनजागृती वाढत चालली आहे. या मुलांना शिक्षण देणे, त्यांच्यामध्ये इतर मुलांप्रमाणेच त्याबाबतची भावना निर्माण करण्यासाठी पालक पुढे येत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सेरेब्रल पाल्सीसह इतर दिव्यांग मुलांसाठी परीक्षेमध्ये विशेष सवलत दिली जाते. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेच्या तुलनेत मार्च २०१८ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेतील सेरेब्रल पाल्सीच्या मुलांची संख्या वाढली आहे. या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाणही खुप चांगले आहे. इयत्ता बारावीनंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणही घेतात. मात्र, अनेकदा शिक्षण घेताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकांना पुढे शिक्षण घेता येत नाही. 
...........................
सेरेब्रल पाल्सीच्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांच्यासोबत शिक्षण घेणे शक्य होत नाही. शाळांमध्ये रॅम्प नसतो. त्यांना विशेष शिक्षकांची गरज असते. त्यांच्यासाठी विशेष शाळाच आवश्यक आहेत. यामध्ये त्यांच्यादृष्टीने सर्व आवश्यक सोयी-सुविधा मिळू शकतात. पण मागील काही वर्षांपासून पालक, शिक्षणसंस्थाही सजग झाल्या आहेत. एका विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाने पहिल्या मजल्यावरील वर्ग तळमजल्यावर केल्याचीही उदाहरणे आहेत.
- पुजा गायवळ, मुख्याध्यापिका
............................
इंटरविडा स्कुलसेरेब्रल पाल्सी लवकर लक्षात आल्यास त्याच्यावर नवनवीन उपचार पध्दतींद्वारे नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे या मुलांच्या स्थितीमध्ये खुप सुधारणा झाली आहे. हा आजार पुर्णपणे बरा होत नसला तरी सुधारणा करणे शक्य आहे. त्यामुळे ते शिकु शकतात. पालकही आता जागृत झाले आहेत.
- डॉ. माधवी केळापुरे, खजिनदार
इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ सेरेब्रल पाल्सी

------------
दहावी व बारावीच्या निकालाची स्थिती
        वर्ष             मार्च २०१७                      मार्च २०१८    
इयत्ता दहावी     परीक्षा दिली       १५७          १९६
        उत्तीर्ण                                 १४१          १७२
इयत्ता बारावी    परीक्षा दिली       ११६         १२३
        उत्तीर्ण                                १०९        १११
-------------------
 

Web Title: They also have 'feet' in education: National Cerebral Palsy Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.