‘ते’ रात्रीसुद्धा कपडे घालूनच तयार असतात, शरद पवारांनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 01:21 AM2020-10-03T01:21:45+5:302020-10-03T01:22:23+5:30
पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूका होण्याची शक्यता वर्तवली. याची खा. शरद पवारांनी खिल्ली उडवली. ...
पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूका होण्याची शक्यता वर्तवली. याची खा. शरद पवारांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, की त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आत्ताच सहा महिने गेले आहेत. असे काही घडेल याच आशेवर त्यांनी आणखी साडेचार वर्षे काढावीत. ‘‘मला वाटते की ते रात्रीसुद्धा (शपथविधीसाठी) कपडे घालूनच तयार असतात,’’ असा चिमटाही त्यांनी काढला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टात जाणार असल्यासंदर्भातले टष्ट्वीट पार्थ पवार यांनी नुकतेच केले होते. या संदर्भात विचारले असता पवार म्हणाले, ‘‘या संदर्भात राज्य सरकार आधीच कोर्टात गेले आहे. आणखी कोणी जात असेल तर दहा जणांनी जावे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी हीच सरकारची आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे.’’ वसंतदादा शुगर इन्सिट्यूटमधील बैठकीनंतर पवार शुक्रवारी (दि. २) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘तेथील सरकारने कायदा हातात घेतला असून टोकाची भूमिका घेतली. कायद्याला कवडीची किंमत त्यांनी दिली नसल्याचे यातून स्पष्ट होते. राहुल गांधींना त्या ठिकाणी जाऊ द्यायला हवे होते. राहुल आणि प्रियंका गांधी हे शांततेत तिथे गेले होते. त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायचे होते. त्यांच्यासोबत जे काही घडले तेही योग्य नाही.’’