.. ‘ते’ करताहेत गतिमंद, अनाथांसह ज्येष्ठांची अनोखी सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 02:39 PM2019-05-15T14:39:00+5:302019-05-15T14:41:56+5:30
त्यांनाही वेगवेगळे ‘हेअर कट’ करायला आवडते... दाढी एकदम चकाचक साफ असावी असे वाढते...
पुणे : त्यांनाही वेगवेगळे ‘हेअर कट’ करायला आवडते... दाढी एकदम चकाचक साफ असावी असे वाटते...पण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर पडलेल्या ‘त्यां’ची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यातील काही तरुण सरसावले आहेत. कर्वे रस्त्यावरील एका हेअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला असून दर महिन्याला गतिमंद विद्यार्थी, Orphanedश्रमातील मुले आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना ही १३ - १४ मुले मोफत सेवा देत आहेत.
मातोश्री वृद्धाश्रमासह हिंगणे बुद्रुक येथील गतिमंद मुलांची शाळा आणि कोथरुड येथील अंध मुलींच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळत आहे. मातोश्री वृद्धाश्रमात तर ज्येष्ठ नागरिक या मुलांची आवर्जून वाट पाहत असतात. येथील आजी-आजोबा आपले केस कापून घेतात. मुलांना वेगळ्या काही हेअर स्टाईल करता येतील का याबाबत आवर्जून विचारणाही करतात. विशेषत: आजी आपले केस कापून घेण्यामध्ये आणि आयब्रोज करुन घेण्यात अधिक उत्साही असतात असे इसावी हेअर अकॅडमीचे विजय वाघमारे यांनी सांगितले. यासोबतच ज्येष्ठांची दाढी करणे, त्यांना हव्या त्या आकारात दाढी करुन दिली जाते.
गतिमंद मुलांना अन्य मुलांसारखेच राहायला आवडते. त्यांनाही सर्वसामान्य मुलांप्रमाणे वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायला आवडतात. अकॅडमीतील मुले त्यांच्या शाळेत गेली की या विद्यार्थ्यांचा चेहरा खुलतो. त्यांना विविध हेअर स्टाईलची छायाचित्र असलेले कॅटलॉग दाखविले जातात. त्यांना जी आवडेल ती हेअर स्टाईल करुन दिली जाते. मुले आणि त्यांचे शिक्षकही या उपक्रमामुळे आनंद होतात. या मुलांनी सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमामध्येही मुलांना अशा प्रकारची सेवा दिली आहे. अंध मुलींना दिसत नसले तरी त्या इतरांना दिसत असतात. त्यामुळे आपणही छान दिसावे अशीच या मुलींची इच्छा असते. त्यांच्याही विविध प्रकारच्या हेअरस्टाईल व आयब्रोज केले जातात. या उपक्रमामुळे अकॅडमी शिकणाऱ्या मुलांना आनंद मिळत असल्याचे संचालक शिल्पा जेयामणी यांनी सांगितले. शिक्षणासोबतच सामाजिक भान आणि जबाबदारीची जाव अधिक वृद्धींगत होत असल्याचे जेयामणी म्हणाल्या.