‘ते’ पोहचले आपापल्या घरी पण नजरकैदेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 03:46 PM2018-08-30T15:46:13+5:302018-08-30T15:57:24+5:30
बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक केलेल्या वरावरा राव, अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्झालवीस यांना पुणे पोलिसांनी त्यांच्या घरी पोहचविले असून तेथे ते नजरकैदेत असणार आहेत़.
पुणे : बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक केलेल्या वरावरा राव, अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्झालवीस यांना पुणेपोलिसांनी त्यांच्या घरी पोहचविले असून तेथे ते नजरकैदेत असणार आहेत़.
पुणे पोलिसांनी मंगळवारी हैदराबाद, नवी दिल्ली, ठाणे, मुंबई, फरीदाबाद येथे छापे घालून डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते व थिंक टँक असलेल्या पाच जणांना अटक केली होती़. त्यापैकी सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांचा ट्रॉन्झिट रिमांड देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता़. त्यामुळे पुणे पोलिसांनी काल राव, फरेरा आणि गोन्झालवीस यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर केले़. त्याच दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली़ .सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारत पाचही जणांना ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात यावे, असा आदेश देऊन पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी ठेवली़ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुणे विशेष न्यायालयाने तिघांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला़.
त्यानुसार पुणे पोलिसांनी त्यांना शिवाजीनगर न्यायालयातून फरासखाना पोलीस ठाण्यात आणले़. रात्री उशिरा त्यांना विशेष बंदोबस्तात त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे़.
त्यांच्या घरी ते नजरकैदेत असतील, त्या ठिकाणी स्थानिक पोलीस व पुणे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे़. मात्र, आता पुणे पोलिसांना त्यांच्याकडे या काळात चौकशी करता येणार नाही़. सर्वोच्च न्यायालय ६ सप्टेंबरला जो निर्णय देतील, त्यानंतरच याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले़ .
वरावरा राव यांनी आपल्याला रिमांडची कॉपी व पंचनामा मराठीत दिल्याचे न्यायालयात सांगितले होते. याबाबत न्यायालयाने कोणताही आदेश दिला नाही़. याबाबत पोलीस अधिकारी म्हणाले, राव यांच्या घरी जेव्हा सकाळी ६ वाजता दरवाजा वाजविला़ तेव्हापासून जप्त केलेल्या वस्तू सील करेपर्यंतचे सर्व व्हिडिओ रेकॉडिंग करण्यात आले आहे़. पंचनामा जरी मराठीत केला असला तरी त्या त्यावेळी त्यांना काय लिहित आहे व काय जप्त केले जात आहे, याची माहिती दिली होती़. त्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये कॉपी देणे बंधनकारक नाही़ जर अन्य राज्यातील पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन कारवाई केली तर ते त्यांच्या भाषेतच पंचनामा करतात़. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत रिपोर्ट देण्याचे बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले़ .