कोरोनामुळे त्याही सापडल्या संकटात ; एकमेकींचा आधार होत केली उपासमारीवर मात..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:28 PM2020-04-09T17:28:16+5:302020-04-09T17:28:56+5:30
संचारबंदीमुळे कोणी त्यांच्याकडे फिरकतही नाही.
पुणे: कोरोना निर्मूलनासाठी लागू झालेल्या संचारबंदीमुळे निर्माण झालेला रोजच्या जेवणाचा प्रश्न बुधवार पेठेतील देवदासींनी स्वतःच एकमेकींचा आधार होऊन सोडवला आहे. एका मंडळाच्या सहकार्याने रोज आळीपाळीने स्वयंपाक करून तब्बल ४०० महिला कशाबशा दिवस ढकलत आहेत.
शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे सध्या हाल सुरू आहेत. बहुतेकजणी परप्रांतीय आहेत. संचारबंदीमुळे कोणी त्यांच्याकडे फिरकतही नाही.शिल्लक पैसा सुरूवातीच्या एकदोन दिवसातच संपला आणि या महिलांना ऊपास घडू लागले. तेही त्यांनी एकदोन दिवस सहन केले. परिसरातील वीर हनुमान मित्र मंडळातील कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आली. रविंद्र कांबळे यांनी पुढाकार घेतला व सहकाराचा एक नवा यज्ञ तिथे सुरू झाला.
आता रोज सायंकाळी या परिसरातील एका मोकळ्या जागेत रोज सायंकाळी तब्बल ४०० महिलांचा स्वयंपाक होतो. या महिलांपैकीच काही महिला हा स्वयंपाक करतात. मंडळाचे कार्यकर्ते त्यांना कोरडा शिधा पुरवतात. त्यासाठीचा खर्च स्वतः करतात. रोज साधारण ४ हजार रूपये लागतात. एक दिवस भात एक दिवस चपाती भाजी असे करत या महिला स्वतःला कशाबशा जगवत आहेत.
रविंद्र कांबळे म्हणाले, सगळ्या महिला अतीशय गरीब आहेत. फसवणूकीतून या व्यवसायात दाखल झाल्या आहेत. तोच बंद पडल्याने त्यांना कोणी वालीच राहिलेला नाही. वेगवेगळ्या प्रांतामधून त्या आल्या आहेत. मदतीसाठी कोणाकडे जावे तर त्यांचे इथे कोणीही नाही. परिसरातील पोलिस ठाण्याकडून सकाळी चहापाण्याची मदत होते. दुपारी काही स्वयंसेवी संस्थांकडून मिळाली तळ जेवणाची पाकिटे मिळतात. संध्याकाळी होत असणारे त्याचे हाल मात्र आता त्यांच्याच मदतीने कमी करण्यात मंडळाला यश आले आहे.