मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते चढले थेट ‘टॉवर’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 03:05 PM2018-08-01T15:05:26+5:302018-08-01T15:15:39+5:30
गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने, व्यवहार बंद ठेवत या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. याच दरम्यान कैलास औटी व शरद औटी या दोघांनीही २६० फुट ऊंचीवरच्या टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले.
बेल्हा : जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथे मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील दोन जणांनी चक्क बंद टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासुनच गावात सर्वत्र शांतता होती. गावातील लोकांनी उस्फुर्तपणे दुकाने, व्यवहार बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. याच दरम्यान कैलास औटी व शरद औटी या दोघांनीही २६० फुट ऊंचीवर बंद असलेल्या टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले.
त्यानंतर या टॉवर खाली गावातील व परिसरातील अनेक जण व पोलीस आले.पोलीस प्रशासनाने याठिकाणी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती.या ठिकाणी २०१३ साली बांधलेला हा टॉवर बंद अवस्थेत आहे. जवळजवळ तीन तास हे आंदोलन केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ जमा झाले होते. निवेदन देण्यासाठी अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्र या आंदोलकांनी घेतला होता. आंदोलकांना बंद टॉवरवरुन खाली उतरण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर आंदोलक या टॉवरवरुन खाली उतरले.
या आंदोलकांवरती कोणतेही गुन्हे दाखल करु नये असे ग्रामस्थांनी व आंदोलकांनी पोलिसांना विनंती केली. मंचरचे प्रांत अजित देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना,आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश उगले,गावकामगार तलाठी रोहिदास वामन,आर.सी.कुमावत,पोलीस पाटील बाळकृष्ण शिरतर आदींना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या.