दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, उपाध्यक्षाची बदनामी केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:11 AM2018-10-03T02:11:47+5:302018-10-03T02:13:00+5:30
उपाध्यक्षाची बदनामी केली : कोनशिलेवरील नाव पुसून टाकले.
पुणे : दी तमिलीयन असोसिएशनच्या उपाध्यक्षाची बदनामी करून संस्थेच्या बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाते काढून लाखो रुपयांची अफरातफर केली. तसेच आर्थिक फायद्यासाठी वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या कोनशिलेवरील नाव काळ्या रंगाने पुसून टाकले़
या प्रकरणी ओमप्रकाश रत्नस्वामी (वय ६८, रा. पिंपळे निलख) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ नोव्हेंबर २०१५ ते ५ आॅगस्ट २०१६ दरम्यान घडली आहे़
रत्नस्वामी हे गेल्या ५० वर्षांपासून सामाजिक कार्य करत असून ते दी तमिलीयन असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. असोसिएशनची शाळा आहे. दरम्यान, दी तमिलीयन असोसिएशनचे पूर्वी दी साऊथ इंडियन असोसिएट्स नाव होते. परंतु संस्थेचे नाव बदलण्यात आले आहे. संस्थेच्या नामांतराचा कार्यक्रम पाहुणे बोलावून करण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या आवारात कोनशिलेचे उद्घाटन केले होते. कोनशिलावर रत्नस्वामी यांचे उपाध्यक्ष म्हणून नाव होते. असोसिएशनमधील दोन पदाधिकाऱ्यांना ही बाब खटकली. त्यानंतर त्यांनी सभासदांची बैठक बोलावली. तसेच संस्थेच्या पूर्वीच्या नावाने असलेल्या लेटरपॅडवरून रत्नास्वामी यांना निलंबित केले. त्यांना अपमानित करून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, संस्थेचे नाव बदलेले असताना बँकांना त्याबाबत माहिती देण्यात आली नाही. तसेच संस्थेच्या पैशांचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून संस्थेच्या पैशांची अफरातफर केली. संस्थेच्या आवारात बसविलेल्या कोनशिलेवरील त्यांचे नाव नाव काळ्या रंगाने पुसून टाकण्यात आले आहे. या प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते हे तपास करत आहेत.