वाॅट्सअप ग्रुप तयार करुन त्यांनी जमवली तीन लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 08:43 PM2019-08-14T20:43:42+5:302019-08-14T20:44:41+5:30
दक्षिण पुणे वकील संघटना व पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने वाॅट्सअप ग्रुप तयार करुन पूरग्रस्तांनासाठी मदत करण्यात आली.
धनकवडी : महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांच्या दु:खावर मदतीची फुंकर मारत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे काम धनकवडी मधील दक्षिण पुणे वकील संघटना व पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. यासाठी वाॅट्सअप ग्रुप तयार करुन मदतीसाठीची रक्कम जमविण्यात आली.
कोल्हापूर व सांगली परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा , पुरामध्ये वाहून गेलेले संसार उभे राहावेत, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी दक्षिण पुणे वकील संघटनेच्या वतीने अभिनव संकल्पना मांडण्यात आली. संघटनेचे सभासद असलेल्या दक्षिण पुणे वकील संघटनेच्या नावाने वाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर रोख रक्कमेची मदत देणारा आकडा टाकून तो मेसेज पुढे पाठवायचा अशी ही संकल्पना होती. कोणी पाच हजार , तीन हजार तर कोणी एक हजार अशी स्वतः ला शक्य असलेली रक्कम आणि स्वतः चे नाव लिहून करून मेसेज फाँरवर्ड होवू लागले. आणि बघता बघता हि यादी ७३ वर गेली आणि जवळपास तीन लाख रुपयांची मदत गोळा झाली.
रोख रक्कमेच्या स्वरूपात मदत गोळा झाल्यानंतर ग्रुपमधील सदस्यांनी एकत्र येऊन जीवनावश्यक वस्तूंची यादी तयार केली. यामध्ये एका कुटुंबाला दहा दिवस पुरेल अशा वस्तूंचा समावेश करण्यात आला. गावात गेल्यानंतर प्रत्येक कुटुंबापर्यंत मदत पोहोचली पाहिजे या उद्देशाने संघटनेच्या वतीने स्थानिक तरुणांची मदत घेतली व गरजूंना घटनास्थळी जाऊन मदत दिली.